विठ्ठल-रखुमाई मूर्ती खरेदीचे बिल रखडले

0

पिंपरी-चिंचवड : महापालिका प्रशासनाच्या वतीने दरवर्षी आषाढीवारी पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांना भेटवस्तू देण्यात येते. त्यानुसार, 2016 मध्ये महापालिकेने वारकर्‍यांना विठ्ठल-रखुमाई यांची मूर्ती भेट स्वरुपात दिली होती. या मूर्तींचा पुरवठा करणार्‍या पुरवठादाराचे 25 लाख रुपयांचे बिल महापालिका प्रशासनाने थकवले आहे. त्यामुळे विठ्ठल-रखुमाई मूर्ती प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यापूर्वी, वारकर्‍यांना देण्यात आलेल्या विठ्ठल-रखुमाई मूर्ती खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने हे प्रकरण महापालिका वर्तुळात चांगलेच गाजले होते.

650 मूर्ती विकत घेतल्या होत्या
सन 2016 मध्ये आषाढीवारी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकर्‍यांना विठ्ठल-रखुमाई मूर्ती भेट देण्यासाठी महापालिकेने अक्षय ग्रीन एनर्जी या संस्थेकडून 650 मूर्ती विकत घेतल्या होत्या. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी 350 तर संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यासाठी 300 मूर्तींचा त्यात समावेश होता. या मूर्तींचे 25 लाख रुपयांचे बिल अद्यापही पुरवठादाराला महापालिकेने दिलेले नाही. हे बिल त्वरित अदा करण्यात यावे, अशी मागणी अक्षय ग्रीन एनर्जी संस्थेकडून अक्षय आल्हाट यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनदेखील दिले आहे.

अन्यथा महापालिकेसमोर उपोषण
2016 मध्ये महापालिकेने अक्षय ग्रीन एनर्जी संस्थेकडून 650 मूर्ती विकत घेतल्या होत्या. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटूनदेखील महापालिका प्रशासनाने त्या मूर्तीचे 25 लाख रुपये दिलेले नाहीत. ते बिल त्वरित देण्याची यावे. अन्यथा नाईलाजास्तव महापालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा पुरवठादाराने दिला आहे. दरम्यान, हे बिल रखडल्याचे समोर आल्यानंतर पुन्हा एकदा विठ्ठल-रखुमाई मूर्ती खरेदी प्रकरण चर्चेत आले आहे.