विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदी प्रकरणात भाजप तोंडघशी

0

पिंपरी-चिंचवड : आषाढी वारीतील दिंडी प्रमुखांना देण्यात येणार्‍या विठ्ठल – रूक्मिणी मूर्ती खरेदीत घोटाळा झाला नसल्याचा निष्कर्ष महापालिका आयुक्तांनी काढला आहे. त्यामुळे मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारा भाजप तोंडावर आपटला असून मुर्ती खरेदी प्रकरणात ’खोदा पहाड…निकला चुहा’ अशी गत सत्ताधारी भाजपची झाली आहे. याप्रकरणात आरोप करण्यात आलेले सह आयुक्त दिलीप गावडे यांना महापालिका आयुक्तांनी दोषमुक्त करत सक्त समज दिली आहे. तर, भांडार अधिकारी सुरेश लांडगे यांना 500 रूपये दंड ठोठाविला आहे. त्याचबरोबर दोघांची खातेनिहाय चौकशीही रद्द केली आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी भ्रष्टाचार झाल्याचा भाजपने केवळ स्टंट केला होता. अखेर सत्याचा विजय झाला आहे. आता भाजप आयुक्तांच्या सहकार्याने करदात्याच्या पैशांवर दरोडा टाकण्याचे काम करत असून हे शहरवासीय उघड्या डोळ्याने बघत आहेत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते योगेश बहल दिली.

25 लाखांचा भ्रष्टाचाराचा आरोप
संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडी प्रमुखांना 2016 मध्ये विठ्ठल – रूक्मिणी मुर्ती भेट देण्यात आली. 25 लाख रूपयांच्या विठ्ठल – रूक्मिणी मुर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने करत चौकशीची माणी केली. तत्कालीन आयुक्तांनी या कथित प्रकरणात प्राथमिक चौकशीसाठी द्विसदस्यीय चौकशी समिती गठित केली. द्विसदस्यीय चौकशी समितीच्या निष्कर्ष अहवालानुसार, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप फेटाळण्यात आले. तर, प्रभावी नियंत्रणाअभावी झालेल्या अनियमिततेस सहआयुक्त दिलीप गावडे आणि भांडार अधिकारी सुरेश लांडगे हे जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार, सहआयुक्त गावडे आणि भांडार अधिकारी लांडगे यांची 11 नोव्हेंबर 2016 रोजी खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली. या दोषारोपांवर गावडे यांनी 29 जून 2017 रोजी तर लांडगे यांनी 27 जुलै 2017 रोजी त्यांचा लेखी खुलासा आयुक्तांकडे सादर केला.

सहआयुक्त गावडे, भांडार अधिकारी गावडे यांचा खुलासा
त्यांनी लेखी खुलाशात सांगितले की, पालखी सोहळ्याचा अल्पावधी लक्षात घेता उत्पादक आणि वितरक असल्याची खात्री करूनच दरपत्रक प्राप्त केले. निविदाधारकांनी पूर्तता केलेल्या कागदपत्रांच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी केलेल्या तपासणीअंती निविदाधारकांना पात्र केले. योग्य त्या स्पर्धेनुसार प्राप्त दर कमी करून पुरवठा आदेश देणे आवश्यक असल्याने वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केले. प्राप्त तीन निविदाकार हे स्वतंत्र व्यावसायिक असल्याने संगनमताने निविदा भरल्याचे म्हणणे योग्य नाही. या प्रकरणात आवश्यक ती मान्यता घेऊन प्राप्त सुचनेनुसार विषयपत्र स्थायी समितीच्या मान्यतेसाठी नगरसचिवांकडे पाठविण्याची दक्षता घेण्यात आली. त्यानंतरच विठ्ठल-रूक्मिणी मूर्तींचा पुरवठा आदेश देण्यात आला. त्यावर दोन्ही अधिकार्‍यांच्या खुलाशांवर विभागप्रमुखांनी अभिप्राय दिले.

गावडे यांना सक्त समज
दिलीप गावडे यांच्या खुलाशांवर निविदा छाननीत पर्यवेक्षकीय त्रुटी असून ई-निविदांच्या प्राप्त दरपत्रकांच्या छाननीमध्ये त्रुटी राहिल्याचे दिसते. तातडीची बाब असल्याने अधिनियमानुसार, कार्योत्तर मान्यता घेणे अपेक्षित असल्याबाबतचा अभिप्राय विभागप्रमुखांनी दिला. तर लांडगे यांनी केलेल्या खुलाशातील स्वतंत्र व्यावसायिक व उत्पादक असल्याची खात्री केल्याच्या बाबींशी विभागप्रमुखांनी असहमती दर्शविली. हे अभिप्राय विचारात घेऊन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहआयुक्त गावडे यांच्याविरोधातील खातेनिहाय चौकशी रद्द केली आहे. मात्र, गावडे यांनी वरिष्ठ अधिकारी या नात्याने आपल्या अखत्यारीतील कर्मचार्‍यांकडून सुयोग्यपणे कामकाज करून घेण्याची जबाबदारी पार पाडली नाही. त्यांच्या कामकाजातील त्रुटींमुळे मूर्ती खरेदी निविदा प्रक्रियेत अनियमितता होऊन महापालिका अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याने गावडे यांना सक्त समज देण्यात आली आहे.

लांडगे यांना दंड
भांडार अधिकारी लांडगे यांच्यावरील खातेनिहाय चौकशीही आयुक्तांनी रद्द केली आहे. मात्र, लांडगे यांचा हलगर्जीपणा, बेजबाबदारपणामुळे मुर्ती खरेदी निविदा प्रक्रीयेत अनियमितता झाली. महापालिका अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याने लांडगे यांच्या नजिकच्या मासिक वेतनातून दंडात्मक कारवाईपोटी 500 रूपये वसूल करण्याचे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी दिले आहेत. यापुढे या दोन्ही अधिकार्‍यांनी कार्यालयीन कर्तव्य पार पाडताना सचोटी व कर्तव्यपालनात कसूर केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश 27 डिसेंबर 2017 रोजी जारी केला आहे.

मूर्ती खरेदी भ्रष्टाचार झाल्याचे कोणतेही पुरावे नसताना भाजपने केवळ भ्रष्टाचाराचे आरोप करुन राष्ट्रवादीला बदनाम केले. बिनबुडाचे आरोप केले, कांगावे केले आणि आता तोंडावर आपटले आहेत. निवडणुकीसाठी केवळ स्टंट केला होता. राष्ट्रवादीवर आरोप करुन भाजपने आपली पोळी भाजून घेतली आहे. यामध्ये भ्रष्टाचार झाला नसल्याचे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर याप्रकरणात दोषी आढळणार्‍यांना तुरुंगात टाका असे सांगितले होते. परंतु, भाजपने केलेल्या आरोपांची आता खरी परिस्थिती समोर आली असून अखेर सत्याचा विजय झाला आहे.
-योगेश बहल, विरोधी पक्षनेते