विणकाम कलेच्या छंदातून आकाराला आला व्यवसाय

0

स्त्री ही कोमल, मृदू तशीच कणखरही! मायेनंजवळ करते अन्प्रसंगी रौद्र रूपही धारण करते. कुटुंब आणि नोकरी-व्यवसाय दोन्ही आघाड्यांवर लढते. संघर्षातून वाट काढत विविध प्रश्‍नांची उकल करते. देवीची विविध रुपेही स्त्रीशक्तीचेच दर्शन घडवतात. या स्त्रीशक्तीला वंदन करणारा नवरात्रोत्सव आजपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त स्वतःची ओळख निर्माण करणार्‍या, कर्तृत्ववान स्त्रियांच्या वाटचालीचा घेतलेला वेध…

त्यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत पण अंगी होती विणकामाची कला! मग, शिक्षणात खंड पडला तरी हीच कला त्यांचे करिअर बनली. थोड्याफार येत असलेल्या विणकामाला प्रशिक्षणाची जोड देत त्यांनी गेली 20 वर्षे विणकाम व्यवसायात शहरात स्वतःची वेगळी ओळख निमार्र्ण केली आहे. ही प्रेरणादायी वाटचाल आहे मृणाल महाबळेश्‍वरकर (वय 46) यांची.

महाबळेश्‍वरकर धायरी येथे स्थायिक आहेत. एक मुलगा आणि पती असे त्यांचे कुटुंब. विवाहनंतर महाबळेश्‍वरकर यांनी काहीकाळ बालवाडी शिक्षिकेचे काम केले. तसेच विवध शोभेच्या वस्तू बनवण्याच्या कंपनीतही काम केेले. पण त्यांना विणकामाची आवड असल्याने नोकरीत त्या फार रमल्या नाहीत, त्यांनी विणकामाच्या छंदालाच व्यवसायाचे रूप दिले. लोकरीच्या विविध वस्तू त्या नातेवाईकांना बनवून द्यायच्या, त्यातून ओळखीच्या लोकांकडूनही त्यांना लोकरीच्या वस्तू बनवून देण्याची मागणी यायला लागली व त्यांच्या व्यवसायाचा पाया रोवला गेला. पुढे त्यांनी हातांनी करायचे विणकाम व यंत्रावर करायचे विणकाम या दोन्हीचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे त्यांची कला अधिकच बहरली. तोरणे, स्वेटर या नेहमीच्या विणकामाशिवाय मुलींसाठी टॉप, स्टोल, शॉल, मोजड्या, श्रग असे कपडे तसेच लोकरीची किचेन, फुलांची परडी, बाहुल्या व अन्य वैविध्यपूर्ण शोभेच्या वस्तू बनवण्यात त्यांनी हातखंड मिळवला आहे.

पुण्यात महापालिकेने आयोजित केलेली प्रदर्शने, भीमथडी जत्रा तसेच संस्थांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनात त्या सहभागी होतात. मुंबई व दुबईतील प्रदर्शनातही त्यांनी सहभाग घेतला आहे. या तीन-चार दिवसांच्या प्रर्द्शनातून त्या सहा हजार रुपये ते 50 हजार रुपयांपर्यंत अर्थार्जन करतात. पतीचा पौरोहित्याचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांच्या विणकामाच्या व्यवसायातून घराला मोठा हातभार लागला आहे. आता कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे आणखी चार-पाच महिलांना त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यांनी महिलांना प्रशिक्षणही दिले आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे महाबळेश्‍वरकर छोट्या उद्योजिकांच्या समूहाशी जोडल्या गेल्या आहेत. मागणीनुसार त्या मसालेही बनवून देतात. भविष्यात त्यांना आपला व्यवसाय वाढवायचा आहे. ‘मदर इंडिया क्रोचेट क्वीन’ या संस्थेतर्फे झालेल्या विणकामाच्या विश्‍वविक्रमातही त्या सहभागी झाल्यात. आता छोट्या व्यावसायिकांच्या पंक्तीत आवर्जून महाबळेश्‍वकर यांचे नाव घेतले जाते. एकूणच, महाबळेश्‍वरकर यांनी घर सांभाळून आपल्या कलेतून फुलवलेला ‘मृणाल वूलन्स’ हा व्यवसाय सर्व गृहिणींसाठी प्रेरणादायी आहे.
– संध्या टोमके, पुणे

व्यवसायाने समाधान व स्वतःची ओळख
पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनीही माझ्या कलेचे कौतुक केले. याचा मला अभिमान आहे. माझ्या विणकामाच्या व्यवसायाने मला समाधान आणि स्वतःची ओळख दिली आहे. आता मला त्यासाठी दुकान घ्यायचे आहे.
– मृणाल महाबळेश्‍वरकर