चार दिवस ढगाळ वातावरण
पुणे : वातावरणातील बदलांमुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याममुळे पुढील तीन दिवस राज्यात बहुतांश भागात वातावरण ढगाळ राहणार आहे. गुरूवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळीवार्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरूवार, शुक्रवार असे दोन दिवस गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, 17 आणि 18 मार्चरोजी संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पुण्यात दोन दिवस ढगाळ वातावरण
पुण्यामध्ये मंगळवार, बुधवार असे दोन दिवस ढगाळ वातावरण होते. बुधवारी राज्यात सर्वात जास्त तापमान 41 अंशसेल्सिअस भीरा येथे नोंदले गेले. तर अहमदनगर येथे सर्वात कमी म्हणजे 16.7 अंशसेल्सिअस तापमान होते. पुढील तीन दिवस शहरातील हवा ढगाळ राहणार आहे. दरम्यान, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
प्रमुख शहरांचे कमाल तापमान
मुंबई 33.4, रत्नागिरी 35.8, भीरा 41.0, पुणे 37.3, अहमदनगर 38.6, जळगाव 39.4, कोल्हापूर 35.7, महाबळेश्वर 31.6, मालेगाव 39.0, नाशिक 36.5, सांगली 37.0, सातारा 33.7, नागपूर 37.5