विदेशी कंपन्यांचे मोबाईल आणखी महागणार!

0

पुणे (सोनिया नागरे) : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने विदेशी कंपन्यांच्या मोबाईलवरील आयातशुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे ब्लॅकबेरी, अ‍ॅप्पलचे आयफोन यासारख्या विदेशी मोबाईलचे वेड लागलेल्या पुणेकरांना मोठा धक्का बसला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, केंद्राने आयात मोबाईलवर 10 ते 15 टक्के इतके अतिरिक्त आयातशुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. सद्या पुणेकरांनी अ‍ॅप्पलच्या आयफोन मॉडेल्सला सर्वाधिक पसंती आहे. त्या खालोखाल विवोसारख्या चिनी कंपन्यांनाही पुणेकर पसंती देत आहेत. गतवर्षीपेक्षा अ‍ॅप्पलचे फोन व टॅबलेट विक्रीत सरासरी 28 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहितीही विविध मोबाईल विक्री दुकानदारांकडून प्राप्त झाली आहे.

पुण्यात आयफोनची सर्वाधिक विक्री!
मोदी सरकारने डझनभर इॅलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर आयातशुल्क वाढविले आहे. त्यात मोबाईल, टॅबलेट, टीव्ही यांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. देशांतर्गत मालाचा खप वाढावा यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मेक इन इंडिया योजनेला बळकटी मिळावी, असा यामागचा सरकारचा हेतू आहे. त्यानुसार, 10 ते 15 टक्क्यांनी आयातशुल्कात वाढ करण्यात आली असून, त्याचा सर्वाधिक फटका अ‍ॅप्पलच्या आयफोन मॉडेल्सला बसला आहे. विशेष बाब म्हणजे, पुण्यात आयफोनची सर्वाधिक विक्री होते. त्या खालोखाल मुंबईचा क्रमांक लागतो, अशी माहिती मोबाईल विक्री करणार्‍या दुकानदारांनी दैनिक जनशक्तिशी बोलताना दिली. अ‍ॅप्पलचा देशांतर्गत विक्री महसूल हा 10 दशलक्ष डॉलर इतका आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा देशाबाहेर जात असल्याची बाब केंद्र सरकारला खटकलीच होती. त्यामुळे घशघशीत आयातशुल्क वाढवून केंद्राने देशांतर्गत मोबाईल कंपन्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी मेक इन इंडिया ही महत्वांकांक्षी योजना लागू करून देशी उद्योगाला बळकटी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयातशुल्क वाढविण्याच्या निर्णयामुळे देशी मोबाईल कंपन्यांना सुगीचे दिवस येतील, असे सरकारला वाटत आहे.

देशात उत्पादन करणार्‍या विदेशी कंपन्यांना धक्का नाही!
सद्या विवो, समसंग, लेविनो, मायक्रोमॅक्स या सेलूलर कंपन्या त्यांचे उत्पादन भारतातच बनवित आहेत. त्यामुळे त्यांना या निर्णयाचा फारसा फटका बसणार नाही. सरासरी पाच कोटी सेलफोन हे देशांतर्गत उत्पादनातून पुरविले जात आहे. तथापि, अ‍ॅप्पल कंपनी भारतात केवळ आयफोन-एसई हेच मॉडेल बनविते. तर इतर सर्व मॉडेल्स हे विदेशातून आयात केले जातात. त्यामुळे करवाढीचा सर्वाधिक फटका अ‍ॅप्पललाच बसणार आहे, असे निरीक्षणही व्यापारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 2017च्या आकडेवारीनुसार दहापैकी आठ फोन हे देशांतर्गत उत्पादीत केले जात असून, सरासरी 10 पैकी दोन फोनचीच आयात होत आहे. त्यामुळे मोबाईलच्या दरावर काहीही परिणाम होणार नाही. ठरावीक कंपन्यांना व त्यांच्या ठरावीक मॉडेल्सच्याच किमती वाढतील, असेही व्यापारतज्ज्ञांनी सांगितले. पुण्यातील ग्राहक हे मोबाईल खरेदीच्या बाबतीत चोखंदळ असून, केवळ आयफोन या ब्रॅण्डपोटी तोच फोन खरेदी करताना त्यांना आयातशुल्कापोटी आता जास्तीचा पैसा मोजावा लागणार आहे. आयफोन एसई वगळता इतर सर्व मॉडेल्सच्या दरात सरासरी 15 ते 20 टक्क्यांनी वाढ होईल, असेही मोबाईल दुकानदारांनी सांगितले.