आठ लाखाच्या मुद्देमालासह २ जण ताब्या
शिरपूर। कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव, प्रसार रोखण्यासाठी तालुक्यात जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आल्याने बंदीच्या काळात विदेशी दारूचा साठा करून चोरटी दारू विक्री करीत असल्याची गोपनिय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने धडक कार्यवाही करत ७ लाख ६४ हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करीत २ जणांना ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही ५ एप्रिल रोजी दुपारी शिरपूर तालुक्यातील आंबा शिवारातील अमरीश पटेल नगर येथे करण्यात आली.
तालुक्यातील आंबा गावात शिवारातील अमरीश पटेल नगर येथे विदेशी दारू विक्री करीत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना ५ एप्रिल रोजी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून कार्यवाही करण्यासाठी निघालेल्या पथकाला रस्त्यात पुन्हा गोपनीय माहिती मिळाली की, धुळे येथील येथील स्विफ्ट डिझायर (क्रं एम एच १८ बीसी ०९५१) ही कार दारू घेण्यासाठी गेली. म्हणून पथकाने न जाता आंबे गावाच्या रोडवर सापळा रचला होता. सायंकाळी ५:३० स्विफ्ट डिझायर गाडी आली असता तिला अडवून तिची तपासणी करण्यात आली. त्यात सुमारे ७३ हजार ६७० रुपये किमतीची देशी-विदेशी दारू मिळून आली.त्यानंतर आंबेगावच्या शिवारातील अमरीशनगर येथील प्रवीण पावरा घरावर छापा टाकला असता तेथे उभी असलेली जयपाल प्रकाशसिंग गिरासे यांच्या कारमध्ये २४ हजार ९६० रुपये किमतीची विदेशी दारू मिळून आली. तसेच प्रकाश पावरा यांच्या शेतातील झोपडीत व शेतात ४० हजार ७१० रुपये किमतीची विदेशी दारूसाठा मिळून आला. असा १ लाख ३९ हजार ३४० रुपये किमतीचा अवैध मद्यसाठासह दोन कार व एक मोटारसायकल असा ७ लाख ६४ हजार ३४० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांनी छापा टाकल्याचे लक्षात आल्याने प्रवीण पावरा व दीपक धोबी घटनास्थळावरून फरार झाले तर जयपाल राजपुत याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता दारूसाठा हा पळासनेर येथील हितेश जयस्वाल यांच्याकडून घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
याप्रकरणी पो.कॉ. राहुल सानप यांच्या फिर्यादीवरून जयपाल प्रकाशसिंग राजपूत, दीपक बन्सीलाल धोबी, रितेश जैस्वाल (तिन्ही रा.पळासनेर),प्रवीण पावरा (रा.अमरीश पटेल नगर), विशाल विनायक वाघ (रा. धुळे) यांच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.राजू भुजबळ व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अनिल पाटील, पोहेकॉ रफिक पठाण, पोना प्रभाकर बैसाने, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे,राहुल सानप यांनी केली.