भुसावळ विधानसभा निवडणुकीसाठी जळगावात भाजपा कोअर कमेटीने जळगावात घेतल्या मुलाखती
भुसावळ : भुसावळ विधानसभा निवडणुकीला अवघा दिड ते दोन महिन्यांचा अवकाश असल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणीला वेग दिल आहे. जळगाव येथे रविवारी भाजपा कोअर कमिटीसमोर 11 मतदारसंघातून तब्बल 164 उमेदवारांच्या मुलाखती दिल्या. त्यात सर्वाधिक चाळीसगावातून 35 तर भुसावळातून सहा इच्छूकांनी मुलाखती दिल्याचे समजते. राज्याचे उर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावर यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. भुसावळ विधानसभेसाठी विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्यासह डॉ.मधू मानवतवर यांच्यासह एकूण सहा इच्छूकांनी आपल्या मुलाखती देत बायोडाटा पक्ष श्रेष्ठींना दिला.
तिकीटावरून भुसावळात दावे-प्रतिदावे
भुसावळ विधानसभेचे तिकीट कुणाला मिळणार? याबाबत सोशल मिडीयावर चर्चा रंगू लागल्या आहेत. विद्यमान आमदार संजय सावकारे यांनाच तिकीट मिळणार असल्याची आशा भाजपेयी असलेल्या नगरसेवक व कार्यकर्त्यांना आहे. महाजनादेश यात्रेनिमित्त भुसावळात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या विराट सभेतही मुख्यमंत्र्यांनी नामदार जावळे, माजी मंत्री खडसे, आमदार सावकारे यांचा हात हातात घेवून मतदारांनाच कौल विचारत भाजपाला मत देणार का? असा प्रश्न विचारत कौल जाणून घेतला त्यामुळे सावकारे हेच भुसावळ विधानसभेचे उमेदवार असतील, हे सांगण्यास ज्योतिषाची गरज नसावी मात्र असे असलेतरी डॉ.मधू राजेश मानवतकर यांच्या गटातून भाजपासाठी दावेदारी केली जात आहे शिवाय अन्य चौघानीही मुलाखती दिल्या असल्यातरी त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहे. तिकीट कुणाला द्यायचे वा नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असलेतरी भुसावळात मात्र सोशल मिडीयावर कार्यकर्त्यांनी नेत्यांविषयी जोरदार लॉबींग करण्यास सुरुवात केली आहे.
तर सावकारेंना तिसर्यांदा मिळणार संधी
आमदार सावकारे सुरुवातीला राष्ट्रवादीच्या व नंतर भाजपाच्या तिकीटावर निवडून आले होते. आता भाजपाने त्यांना उमेदवारी दिल्यास सलग तिसर्यांदा ते जनतेपुढे जाणार आहेत. सावकारे यांनी शहरातील अतिरीक्त सत्र न्यायालय, ग्रामीण रुग्णालय, ट्रामा केअर सेंटर, क्रीडा संकुल, अतिरीक्त सत्र न्यायालयात दोन मजल्यांना मंजुरी यासह तालुक्यात विविध विकासाची कामे केली आहेत तर नुकतीच तालुक्यात कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून पक्षश्रेष्ठी आमदारांना पुन्हा संधी देतील, असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे. दरम्यान, भुसावळातून इच्छुकांची संख्या प्रचंड असलीतरी तिकीट नेमके द्यायचे कुणाला हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठ घेत असल्याने निर्णयाकडे लक्ष लागले आहे.