एकनाथराव खडसे ; पार्लमेंटरी बोर्ड घेणार अधिकृत निर्णय
भुसावळ- विद्यमान खासदार ए.टी.नाना पाटील व खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट कट होणार असल्याच्या हल्ली प्रसिद्धी माध्यमात बातम्या झळकत आहेत मात्र या तर गावगप्पा असून त्या माध्यमातून नागरीकांचे मनोरंजन होत असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे दिली. भुसावळात 21 रोजी विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असून त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परीषद घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर प्रसिद्धी माध्यमांनी विद्यमान खासदारांचे तिकीट कट होत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना खडसे बोलत होते.
विना टॅक्सने नागरीकांचे मनोरंजन
ए.टी. नाना असो की खासदार रक्षा खडसे असो त्यांचे तिकीट कट केले जाणार असल्याच्या हल्ली गावगप्पा सुरू असून या माध्यमातून नागरीकांचे चांगलेच मनोरंजन होत त्यासाठी मात्र कुठलाही टॅक्स लागत नाही व उमेदवारांचा प्रचारही होत असल्याचे खडसे यांनी सांगत अप्रत्यक्षपणे विद्यमान खासदारांनाच तिकीट मिळणार असल्याचे सुतोवाचही केले मात्र अंतिम निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेणार असल्याचे सांगण्यासही खडसे विसरले नाहीत.
भाजपाचे खासदार ‘मौनी’ नव्हेत
जळगावात झालेल्या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या मेळाव्यात भाजपाचे खासदार मौनी असल्याबाबत आपण बोललेलो नाही मात्र आपल्या विधानाचा माध्यमांनी विपर्यास केल्याचे खडसे म्हणाले. भाजपाचे खासदार निवडून येण्यापूर्वी असलेले खासदार मौनी होते, असे आपण बोलल्याचे त्यांनी ठासून सांगत माध्यमांनी आपली क्लीप तपासून पहावी, असे आवाहनही त्यांनी केले.
खडसे गट ही मिडीयाची वावटळी
माजी मंत्री खडसेंचे अडीच वर्षांपासून न झालेले पुर्नवसन व त्यामुळे खडसे गट तयार झाला असून मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धत्तीविषयी तो नाराज आहे शिवाय बहिणाबाई महोत्सव व दीपनगर 660 प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देवूनही ते न आल्याने भाजपात गटबाजी आहे का ? असा प्रश्न छेडला असता खडसे यांनी भाजपात कुठलेही गट, तट नाही, केवळ मिडीयाने रंगवलेले हे चित्र आहे, असे त्यांनी सांगत आपली पक्षाबाबत नाराजी असलीतरी ती आपण पक्षाच्या कार्यक्रमातही व्यक्त केल्याचे त्यांनी सांगत दोन्ही कार्यक्रमांवेळी मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या बैठकीला जावे लागल्याने ते आले नाहीत मात्र आता 21 तारखेच्या दौर्यासाठी शहरात ते निश्चित येतील, असे खडसे म्हणाले.