विद्याधर पानट लिखीत मराठी इंग्रजी काव्यसंग्रहाचे प्रकाशन

0

जळगाव । मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या चारही भाषांमध्ये काव्यरचना करून ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट यांनी साहित्य जगतात आगळे वेगळेस्थान निर्माण केले आहे. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्य दर्जाच्या,सांस्कृतिक शब्दांची गुंफण पानट सरांच्या साहित्यात आढळते असे भावोत्कट विचार मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुळकर्णी यांनी व्यक्त केले. राणाशाहीर आणि नामवंत वक्ते, ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट यांच्या मराठी आणि इंग्रजी काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. विद्याधर पानट यांच्या गणेशचतुर्थीच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या निवासस्थानी पुस्तकाच्या प्रकाशनाचा छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला.

‘हा खेळ सावल्यांचा’
या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. कुळकर्णी यांच्या तर ‘हा खेळ सावल्यांचा’ या मराठी काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. सचिन देशपांडे आणि गणेश देशपांडे यांच्याहस्ते करण्यात आले. पानट सरांच्या हिंदी आणि उर्दू संग्रहाचे काम अंतिम टप्प्यात असून त्याचेही प्रकाशन लवकरच होईल अशी माहिती कृपा प्रकाशनचे संपादक विभाकर कुरंभट्टी यांनी दिली. सुंदर अक्षर चळवळीचे प्रमुख तथा जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागातील किशोर कुळकर्णी, गणेश देशपांडे, डॉ. सचिन देशपांडे, लता पानट यांची या प्रसंगी मनोगत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृपा प्रकाशनचे विभाकर कुरंभट्टी यांनी तर पानट सरांची मानसकन्या रेखा चधरी यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमास कृपा प्रकाशनच्या संचालिका रेवती कुरंभट्टी, एकनाथ देशपांडे, डॅा.अमृता देशमूख, नीता झोपे, रेखा चौधरी, उत्कर्षा कुरंभट्टी शब्बीर सय्यद, ब्राईट मीडियाचे सुनील चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

पानट यांना सुखद धक्का
गेल्या सहा महिन्यांपासून विद्याधर पानट प्रकृतिअस्वास्थ्यामुळे घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यांना सुखद धक्का म्हणून संयोजकांनी सरांच्या पुस्तकांचे प्रकाशन पानट घरीच करायचे ठरविले. आपल्या किती पुस्तकांचे प्रकाशन होत आहे त्याची यत्किंचित कल्पना संयोजकांनी अथवा पानट कुटुंबियांनी पानट यांना दिलेली नव्हती. एकाच वेळी मराठी व इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन झाले. जन्माला आलेले बाळ जसे हातात द्यावे तसे ही दोन पुस्तके माझ्या हातात दिली. माझा परिवार मोठा आहे, मी परिवार नियोजन मानत नाही अजूनही पुस्तकांची निर्मिती करीन असे विनोदाने पानट म्हणाले.