चिंचवड : भारतील राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त चिंचवड, विद्यानगर येथे त्यांच्या प्रतिमेस भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी नगरसेवक राम पात्रे, रमाई प्रतिष्ठानचे नितीन शिंदे, संभा गायकवाड, पटेल यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी अमित गोरखे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा असा मुलमंत्र दिला. त्यांच्यामुळेच आज दलित समाजातील तरुण मुले-मुली शिक्षण घेऊन मोठ-मोठ्या पदावर उत्कृष्टपणे कार्य करत आहेत. आपल्या कामाचा ठसा उमटवित आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकांडपंडित होते. त्यांचा विविध विषयांवरचा व्यासंग अफाट होता. त्यांनी अनेक विषयांवर मूलभूत चिंतन केले. त्यातून अनेक अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथसंपदेची निर्मिती झाली.