विद्यापिठाकडून 153 निकालांची घोषणा, 10 ऑगस्ट नवीन डेडलाइन!

0

मुंबई : मुंबई विद्यापिठातील विद्यार्थ्यांचे निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्यासाठी राज्यपालांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना आदेश दिले होते. त्यावर 31 जुलैपर्यंत निकाल लागतील, अशी ग्वाही कुलगुरूंनी दिली होती. त्याला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अनुमोदन दिले. प्रत्यक्षात मात्र मुदतीपर्यंत विद्यापिठाला 153 परीक्षांचे निकाल जाहीर करणे शक्य झाले. अद्याप 3 लाख 25 हजार तपासण्याविना पडून आहेत. तसेच विद्यापिठाने ज्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्याचा दावा केला आहे, ते अद्याप दिसत नाहीत, त्यामुळे निकालांची नुसतीच घोषणा केली कि काय, अशी आजची स्थिती आहे. निकाल ऑनलाईन दिसत नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. एकूणच काय तर गोंधळाची मालिका अजून कायम असल्याचे चित्र आहे. दरम्यान विद्यापिठाला हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या कमी दिवसांत लाखो उत्तरपत्रिका तपासाव्या लागत असल्याने त्या अतिघाईत तपासल्या जात आहेत, ज्यामुळे त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे शिक्षणतज्ज्ञ म्हणत आहे. दुसरीकडे राजकीय पातळीवर कुलगुरूंना राज्यपाल काय शिक्षा करणार, यावरही चर्चा सुरू झाली आहे.

वाणिज्य, विधी, कला शाखांचे निकाल प्रलंबितच
153 परीक्षांचे निकाल हे छोट्या विषयांच्या शाखांचे निकाल आहे. प्रलंबित असलेल्या 3.25 लाख उत्तरपत्रिकांपैकी 2.60 लाख उत्तरपत्रिका वाणिज्य शाखेतील आहेत. 30 हजार विधी शाखेतील आहेत. तर उर्वरित कला आणि विज्ञान शाखेतील आहेत. त्यामुळे या शाखांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीवरच आहे.

प्राचार्य नीरज हातेकरांचा राजीनामा
31 जुलैपर्यंत निकाल घोषित करण्यासाठी विद्यापीठाने घिसाडघाई केली. निकाल वेळेत लागणार नसल्याचा अंदाज येताच विनाकारण प्राध्यापकांना त्रास देण्यास आणि धमकावण्यास सुरुवात केली. याच दरम्यान विद्यापीठाच्या गलथान कारभाराबाबत आणि ऑन लाइन पेपर तपासणीबाबत आपली नाराजी व्यक्त करणार्या डॉ. नीरज होतकर यांनाही विद्यापीठाने त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अखेर डॉ. हातकर यांनी स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आणि अशा गलथान कारभारात काम करण्यासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले. दरम्यान विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणार्या शिक्षकांनी राजीनामा देण्यापेक्षा कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया छात्रभारती संघटनेचे अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी दिली.