विद्यापीठांचे राजकीय अड्डे बनविण्याचा आघाडी सरकारचा घाट

विद्यापीठ विकास मंचतर्फे तीव्र निषेध

शिंदखेडा। मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची राज्यातील विद्यापीठांच्या प्रभारी कुलपतीपदी नियुक्ती करावी, अशी शिफारस केली आहे. ही शिफारस म्हणजे शिक्षणाला राजकीय अड्डा बनविण्याचा आघाडी सरकारचा घाट आहे. राज्यातील शैक्षणिक वातावरण प्रदूषित करणारा राज्यातील/विद्यापीठांवर अंकुश ठेवण्यासाठी, सत्तेतील राजकीय पक्षांच्या दावणीला शिक्षण व्यवस्था बांधण्याचा काळा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. विद्यापीठ विकास मंचच्यावतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमोल मराठे यांनी पत्रकाद्वारे त्याचा तीव्र निषेध केला आहे.

महाराष्ट्रातील उच्चशिक्षणातील सर्व घटकांनी आघाडी शासनाच्या निर्णयाविरोधात आवाज उठविण्याची आवश्यकता आहे. सरकारद्वारे विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर घाला घालण्याचा हा निर्णय आहे. सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशीही मागणी अमोल मराठे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.