विद्यापीठांनी युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण देणारे अभ्यासक्रम तयार करावेत

0

‘माहेड’च्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : राज्यातील युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण देणारे अभ्यासक्रम विद्यापीठांनी तयार करावेत, शिक्षणाचा दर्जाही गुणवत्तापूर्ण असावा,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. महाराष्ट्र उच्च शिक्षण संदर्भात नेमलेल्या ‘माहेड’ आयोगाची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  विनोद तावडे, राज्यमंत्री  रवींद्र वायकर यावेळी उपस्थित होते. राज्यातील प्रत्येक विद्यापीठ अभ्यासक्रमांचे पंचवार्षिक आराखडे ‘माहेड’आयोगाकडे सादर करतात. त्यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. यावेळी तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ. बी. एन. जगताप यांनी सादरीकरण केले. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी आणि रोजगाराला चालना मिळण्यासाठी कौशल्य व रोजगार स्वयंपूर्ण करणारे अभ्यासक्रम असावेत, अशी  शिफारस तज्ञ समितीने केली आहे.

या बाबींचा आढावा घेऊन मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, तरुणाईला मिळणाऱ्या शिक्षणातून त्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. युवक स्वयंरोजगारपूर्ण व्हावेत यासाठी विद्यापीठांनी त्यांच्या पारंपरिक अभ्यासक्रमाची सांगड ही रोजगार मिळवून देणाऱ्या शिक्षणाशी घातली पाहिजे. काळाची गरज ओळखून आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी मिळतेजुळते असे तांत्रिक शिक्षण मिळाल्यास बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल. विद्यापीठांनी अभ्यासक्रमाचे आराखडे तयार करताना रोजागाराभिमुख शिक्षण ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी दक्ष असले पाहिजे, त्याचा दर्जाही उत्तम असायला हवा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तावडे म्हणाले, ‘माहेड’च्या माध्मयातून राज्याकील युवक स्वयंपूर्ण होण्यासाठी तज्ज्ञसमितीने अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. युवकांना रोजगार मिळावा यासाठी राज्यात कुठल्या भागात किती गुंतवणूक आली आणि येणार आहे याची माहिती उद्योग विभागाकडून घेऊन त्यानुसार गरजेप्रमाणे रोजगाराला चालना देणारे अभ्यासक्रम तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह ‘माहेड’ अंतर्गत तज्ज्ञ समितीचे सदस्य उपस्थित होते.