विद्यापीठाच्या अधिसभेवर सुनेत्रा पवार?

0

पुणे । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर व्यवस्थापन व पदवीधर कोट्यातून अर्ज केलेल्या उमेदवारांची शुक्रवारी छाननी झाली. त्यात व्यवस्थापन गटातून नीलिमा पवार यांचा अर्ज विवाह प्रमाणपत्र नसल्याच्या कारणावरून बाद ठरविण्यात आला. व्यवस्थापन महिला गटातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि नाशिकच्या नीलिमा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यातून पवार यांचा अर्ज रद्द झाल्याने सुनेत्रा पवार हे बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नीलिमा पवार यांचे दोनही अर्ज अवैध ठरल्याने महिला गटातून सुनेत्रा पवार यांची निवड निश्‍चित झाली आहे. 86 उमेदवारांचे 143 अर्ज आले होते. त्यापैकी 29 जणांचे अर्ज छाननीत अपात्र ठरविण्यात आले.

व्यवस्थापनाच्या अनुसूचित गटातून पुणे विद्यार्थी गृहाचे राजेंद्र कांबळे यांचा एकमेव अर्ज होता. मात्र या संस्थांच्या महाविद्यालयांनी नव्याने नॅक मूल्यांकन न केल्याने त्यांचा अर्ज रद्द केल्याने ही जागा रिक्त राहणार असल्याचे दिसून येत आहे. शामकांत देशमुख, महेश ढमढेरे, राजीव जगताप, संदीप कदम, सोमनाथ पाटील, अशोक सावंत, दीपक शहा आणि राजेंद्र विखे-पाटील हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अर्ज माघारी घेण्यासाठी 6 नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.