विद्यापीठाच्या जेवणात पुन्हा अळ्या

0

विद्यापीठ प्रशासन जेवणाच्या दर्जाबाबत गंभीर नसल्याचा आरोप

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील (रिफेक्ट्री) जेवणात पुन्हा एकदा अळ्या आढळल्या आहेत. जेवणात अळ्या आढळल्याच्या प्रकाराला दोन दिवस उलटत नाहीत, तोच पुन्हा हा प्रकार घडल्याने विद्यापीठ प्रशासन जेवणाच्या दर्जाबाबत गंभीर नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीत विद्यापीठाने मान्य केलेल्या दरात जेवण दिले जाते. त्यामुळे शेकडो विद्यार्थी मासिक पास काढून रिफेक्ट्रीत जेवतात. कंत्राटी पद्धतीने रिफेक्ट्री चालवली जाते. मात्र, कंत्राटदाराकडून जेवणाबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

विद्यापीठाने चौकशी केली सुरू

विद्यार्थ्यांना गेल्या आठ दिवसांत चार वेळा जेवणात अळ्या आढळल्या आहेत. जेवताना अळ्या आढळल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला विद्यार्थ्यांना तीन दिवस गोड पदार्थ देण्याचे आदेश दिले गेले. रिफेक्ट्री कंत्राटदाराला तीन दिवसांत श्रीखंड, जिलेबी आणि आम्रखंड देण्यास सांगितले होते. मात्र, त्यापलीकडे कोणतीही कडक कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांना मिळणार्‍या जेवणाच्या दर्जाबाबत गंभीर नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. रिफेक्ट्रीतील जेवणाच्या दर्जाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने त्याची चौकशी सुरू केली आहे. या मागे काही खोडसाळपणा नाही ना, याचीही तपासणी केली जाईल,’ असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.