अहवाल सादर करण्यासाठी समितीने वाढवून घेतला वेळ
पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमातील विषयाच्या प्रश्नपत्रिका फुटल्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीद्वारे चौकशीबाबतची कार्यवाही अजुनही पूर्ण झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अहवाल सादर करण्यासाठी समितीने वेळ वाढवून घेतला असून, येत्या चार-पाच दिवसात तो व्यवस्थापन परिषदेत सादर करण्यात येणार आहे. प्रथम वर्ष विधी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी विद्यापीठाच्या वेबसाइटवरच फुटल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. त्यामुळे संबंधित विषयांची पुन्हा परीक्षा घेण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली.
विद्याार्थी संघटनांची कारवाईची मागणी
प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार उघडकीला आल्यानंतर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यामुळे विद्याार्थी संघटनांनी आंदोलन करून कारवाईची मागणी केली होती. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठाने संबंधित प्रकरणात व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली. राजेश पांडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत डॉ. संजय चाकणे, डॉ. सुधाकर जाधवर, डॉ. महेश आबाळे यांचा समावेश करण्यात आला. या समितीद्वारे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि आवश्यक कारवाईच्या शिफारशीचा अहवाल सादर करण्यात येईल, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आल होते. मात्र, या प्रकरणाची चौकशी अद्याप पूर्ण न झाल्याने समितीने वेळ वाढवून मागितला असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.