विद्यापीठाच्या बोधचिन्हातून ‘शनिवारवाडा’ काढून टाका

0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हामधून कमळातील ‘शनिवारवाडा’ काढून त्याजागी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावावी अशी मागणी सत्यशोधक ओबीसी फेडरेशनसह पंधरा संस्थांनी केली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ही मागणी करण्यात आली.

तीन वर्षांपूर्वी विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले यांच्या नावाने नामांतर करण्यात आले. 1948 साली तत्कालीन पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर 1950 साली कमळात शनिवारवाडा असे बोधचिन्ह (लोगो) तयार करण्यात आले. मात्र अजूनही जुने बोधचिन्ह बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे बोधचिन्हात तात्काळ बदल करावा व फुले यांचा पुतळा विद्यापीठ परिसरात उभारण्यात यावा अशी मागणी या संस्थांनी केली आहे.

सचिन माळी म्हणाले, मुलींना शिक्षणाची दारे खुले करणार्‍या सावित्रीमाईंचे नाव विद्यापीठाला देणे योग्य आहेच; मात्र बोधचिन्हात त्यांची प्रतिमाही वापरायला हवी. ज्याप्रमाणे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे; त्याप्रमाणे पुण्यातही फुले यांची प्रतिमा वापरावी. अशी मागणी करण्यात आली आहे.