विद्यापीठाजवळ अपघात; कुसुंब्यातील दुचाकीस्वार जागीच ठार

एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूमुळे आई-वडिलांनी केला आक्रोश

जळगाव- अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील देवगाव येथील तरुण रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास विद्यापीठाजवळील महामार्गावर जागीच ठार झाला.
सोपान सुभाष शिरसाठ (वय 25, मूळ रा. कुसुंबा, ता. चोपडा, ह.मु. देवगाव, ता.जि.जळगाव) या तरुणाच्या चुलत मामाचा साखरपुडा बामणोद (ता. यावल) येथे होता. तो साखरपुड्याला जाण्यासाठी मोटारसायकल (क्र.एमएच 19 डीएम 6653) ने रविवारी सकाळी घरातून निघाला. मात्र, तो साखरपुड्याला न जाता पाळधी
येथे मामा वासुदेव नामदेव सोनवणे यांच्या ढाब्यावर आला. तेथे मामा भेटले नाही, म्हणून सोपान शिरसाठ मोटारसायकलने देवगाव येथे जाण्यासाठी निघाला. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून जात असताना दुपारी 4 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यात सोपान शिरसाठ याचा जागीच मृत्यू झाला.
सोपान हा अविवाहित असून तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला तीन विवाहित बहिणी आहे. या घटनेबाबत कळतात कैलास नामदेव सोनवणे व वासुदेव नामदेव सोनवणे (रा.सत्यम पार्क) हे दोघं मामांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाजवळ धाव घेतली. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.