पुणे । गरज संपली असेल तर ग्रामीण, दलित, आदिवासी असे जातीयतेला अधिकाधिक खतपाणी घालणारे विद्यापीठातील अभ्यासक्रम बंद झाले पाहिजेत. कारण विद्यापीठात जाऊन विद्यार्थी तिथे जातच शिकतात आणि हे बाहेर पडणारे शिक्षित येडे पुन्हा समाजात जातीयवादच करीत राहतात, हा जो विरोधाभास आहे तोच खरा संघर्षाचा काळ आहे, अशा परखड विचारांतून ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी जातीयवादाच्या मर्मावरच बोट ठेवले.साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने 17व्या साहित्यिक कलावंत संमेलनात ‘सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्य’ याविषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी सहभाग घेतला.
कोणत्या जातीच्या उमेदवाराला किती मते…
साहित्य मग ते कुठल्याही कालखंडातील असो ते आजही वाचले जाते. तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरी सापडणार नाही. मात्र किती लोकांनी ती वाचली हा खरा प्रश्न आहे? शासनाने महात्मा फुले यांचे समग्र ग्रंथ काही वर्षांपूर्वी 10 रुपये किमतीत विकले. आज शाहू-फुले आंबेडकर ही समाजात केवळ एक म्हण ठरली असून, त्याचा तुळीसारखा वापर होतो आहे. 1980च्या दशकानंतरच्या साहित्याचा आढावा घेतला तर त्या काळातील साहित्यामध्ये फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार व मूल्यवस्थेचा प्रभाव पाहायला मिळतो. मात्र व्याख्यानांमधून ही नावे उच्चारताना चोखंदळपणे विचार केला जातो. त्याकाळात या चळवळी एकीकडे स्वत:चा आवाज पोहोचविण्याचा प्रयत्न करीत होत्या तर दुसरीकडे जात-धर्म अशी टोकाची कर्मठताही आली. साहित्य हे अशा जातीपातीत विभागले जाणे हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. विद्यापीठे, पुरस्कार सोहळे, सत्कार समारंभ हे जातीयतेतवाटले गेले आहेत. कोणत्या जातीच्या उमेदवाराला किती मते पडतील हे जाहीरपणे लिहिले जात आहे. यातच सध्या मुस्लीम साहित्याची स्थिती पाहिली तर त्यांच्या साहित्यामध्ये मूल्यव्यवस्थेवर केलेले भाष्य वाचायला मिळत नाही. देशात अन्याय होणारी ही एकच जात आहे जी एका विचित्र कोंडीत सापडली आहे. केवळ धर्माच्या गोडगोष्टी ते साहित्यातून मांडत आहेत, याकडे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.