विद्यापीठातील पोलिस चौकीचा अहवाल सादर करा

0

पुणे । रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील काढलेली पोलिस चौकी ही हेरिटेज-1 गटातील आहे. त्यामुळे तिचे स्थलांतर करताना, पुरातत्व विभागाच्या नियमांनुसार आणि सूचनांनुसार झाले की नाही, या बाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने महापालिकेच्या पथ विभागास दिल्या आहेत.

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेने ही चौकी काढली होती. मात्र, ती हेरिटेज स्ट्रक्चर असल्याने पालिकेने ती रातोरात आणि चुकीच्या पध्दतीने काढली असल्याची तक्रार काही नागरिकांकडून करण्यात आली होती. त्याची दखल घेत महापालिकेकडून चौकी काढण्यासाठी पुरातत्व विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच नियमांची अंमलबजावणी केली काही नाही याचा खुलासा मागविण्यात आला आहे. यामुळे महापालिका प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली असून त्यासाठीचा अहवाल तयार करण्याचे काम पथविभागाकडून सुरू आहे.

चौकीच्या बांधकामाचे साहित्य सुरक्षीत
पुरात्त्व विभागाच्या नियमांनुसार, तसेच त्यांच्या परवानगीनेच ही चौकी काढण्यात आली असून ती नवीन जागेत पुन्हा आहे तशीच उभारली जाणार असल्याचा दावा पथ विभागाकडून करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक असलेले चौकीचे फोटो, चौकीच्या बांधकामांचे दगड तसेच इतर सर्व साहित्य पालिकेकडून सुरक्षीत ठेवण्यात आल्याचा दावा पथ विभागाच्या अधिकार्‍यांकडून करण्यात आला आहे.

पुरातत्व विभागाने पाठविलेल्या पत्रानुसार आणि त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, या चौकीचे सर्वेक्षण, दिशानिहाय रचना, अंतर्गत रचना, जागेची रचना या सर्व बाबींची तपासणी करून घेऊन त्यानंतर ती काढणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी पालिकेकडून पुरातत्व विभागाशी कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही. त्यानंतर नागरिकांनीही तक्रार केली आहे. त्यामुळे त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश पालिकेस देण्यात आले आहेत.