विद्यापीठातील प्राध्यापक घोटाळाप्रकरणी तंत्र विभागाचे संचालक माने निलंबित

0

मुंबई : औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये २०१२ मध्ये झालेल्या पाठक, अधिव्याख्याता व वर्ग ३ पदांवर नियमबाहय व चुकीच्या पध्दतीने निवड करत नियुक्त्या करण्यात आल्याचा ठपका ठेवत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली.

विधानसभेचे कामकाज सुरु होताच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत मराठवाडा विद्यापीठात नियुक्त करण्यात आलेल्या प्रपाठक, अधिव्याख्याता आणि प्राध्यापकांची नियमबाह्य पध्दतीने करण्यात आली. तसेच याप्रकरणी मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी त्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात हक्कभंग आणत निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

सुरुवातीला उच्च तंत्रशिक्षण मंत्री तावडे यांनी यासंदर्भात चौकशी करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही शिवसेनेचे सुभाष साबणे, अतुल सावे, जयप्रकाश मुंदडा आणि भाजपचे प्रशांत बंब यांनी माने यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.

त्यावर मंत्री तावडे म्हणाले की, याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्यासाठी मंत्रालयातील ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माने यांच्यावर कारवाई करण्यात चाल-ढकल केली अथवा पाठीशी घातले अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच डॉ. माने यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याची जाहीर घोषणाही केली.