विद्यापीठातील सेवकांना गणवेशाची सक्ती

0

पुणे । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेवकांनी विद्यापीठाने दिलेला गणवेश दररोज कार्यालयीन वेळेत परिधान करावा. गणवेश परिधान न करणार्‍या सेवकांवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता सेवकांना गणवेश सक्तीचे होणार आहे.

विद्यापीठातील वर्ग-3 मधील तांत्रिक पदांवर कार्यरत असलेल्या काही सेवकांना व वर्ग -4 मधील विविध पदावर कार्यरत असलेल्या सर्व सेवकांना विद्यापीठामार्फत प्रत्येकी 3 गणवेश देण्यात आलेले आहेत. संबंधित सेवकांनी कार्यालयीन वेळेत गणवेश परिधान करणे अनिवार्य आहे. मात्र सेवकांना वारंवार सूचना देऊन देखील बरेच सेवक विद्यापीठाने दिलेला गणेवश परिधान करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे काही सेवकांनी सर्वसाधारण विभागाकडून वारंवार संपर्क साधूनही गणवेश घेतलेला नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.

प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी सेवकांना गणवेश परिधान करणे सक्तीचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. गणवेश परिधान करणार नाहीत, त्या सेवकांना नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वीही विद्यापीठ प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊनही काही सेवकांकडून गणवेश परिधान करण्याबाबत दुर्लक्ष होत आहे. बहुतांश सेवक पांढर्‍या रंगाचा गणवेश परिधान करून विद्यापीठात सेवा बजावत आहेत.