पुणे । विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बॅटरीवर चालणार्या 14 सीटर बस खरेदी करणार आहे. या बसेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यापीठातील संपूर्ण परिसरात फिरता येणार आहे. बस खरेदीची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच या बसेस विद्यापीठातील रस्त्यावर धावणार असल्याची माहिती विद्यापीठातील अंतर्गत वाहतूक समितीचे अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.
अंतर्गत वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने ही पावले उचलली आहेत. विद्यापीठाला दोन गाड्या सीएसआरच्या माध्यमातून मिळाल्या आहेत. त्यातील एक गाडी बॅटरीवर चालणारी तर दुसरी गाडी सौर ऊर्जेवर चालणारी आहे. परंतु सीएसआरच्या माध्यमातून मिळालेल्या गाड्यांना मर्यादा आहेत. त्यामुळे आता विद्यापीठानेच त्यांना आवश्यक असणार्या गाड्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनच अंतर्गत वाहतुकीसाठी दोन 14 सिटर बस खरेदी करण्याचा निर्णय मॅनेजमेंट कौन्सीलच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
पर्यावरण पूरक वाहतुकीला प्राधान्य
विद्यापीठात पर्यावरण पुरक वाहतूक व्यवस्था असावी असा कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा आग्रह होता. लवकरच दोन बस विद्यापीठात दाखल होतील. ही सुविधा विद्यार्थ्यांना मोफत द्यायची की, विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारायचे याबाबतीत मात्र निर्णय झाला नसल्याचे पवार यांनी माहिती देताना सांगितले. सध्या विद्यापीठात सुरू असलेले बॅटरीवरील वाहन केवळ काही दिवस सुरू होते. मात्र, ते पुन्हा बंद पडले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला अहे. याविषयी विचारले असता त्यांनी एक दिवस फक्त देखभाल दुरूस्तीसाठी वाहन बंद ठेवण्यात आले होते. हे वाहन सध्या सुरळीत सुरू असल्याचे सांगितले.