विद्यापीठात प्राध्यापकांची 170 पदे रिक्त

0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयात 170 प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याची माहिती राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडून देण्यात आली. पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात जवळपास 45 टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे स्पष्ट होत आहे.

पुणे विद्यापीठातील वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकांची मंजूर पदाची संख्या 386 आहे. त्यातील 216 प्राध्यापकांची पदे कार्यरत असून, उर्वरित रिक्त आहेत. गेल्या एक-दोन वर्षांपासून प्राध्यापकांची पदे भरण्यास राज्य शासनाने बंदी केली आहे. त्यामुळे संस्थांना कंत्राटी अथवा तासिका तत्वावरील प्राध्यापकांवर महाविद्यालये चालवावी लागत आहे. त्यामुळे प्राध्यापकांच्या भरतीवरील बंदी उठवावी, अशी मागणी शिक्षक संघटनेने केली आहे.

राज्यात 8 हजार पदे रिक्त

राज्यात 9 हजार 511 प्राध्यापकांची पदे रिक्त असून, सर्वच विद्यापीठात प्राध्यापकांची सुमारे 50 टक्के पदे रिक्त असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मान्यताप्राप्त प्राध्यापकच नसल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. एवढेच नव्हे तर राज्यातील 260 अनुदानित महाविद्यालयांना प्राचार्य नसून, 163 महाविद्यालयात ग्रंथपाल आणि 139 शारिरिक शिक्षण संचालकच नाहीत. तसेच, अर्धवेळ अध्यापकांची सर्वची सर्व 65 पदे रिक्त आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यात 8 हजार शिक्षकेत्तर पदेही रिक्त आहेत.