समित्या व नियुक्त्यांच्या खुलाशाची मागणी
जळगाव :कवियात्रि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बेकायदेशीर व मनमानी कारभार सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केला असून, या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने खुली चर्चा करण्याचे थेट आव्हान या संघटनेने दिले आहे.
माहिती पूर्णपणे देत नाही
संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, कुलगुरू व विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठाच्या टीए, डीए संदर्भात असलेले विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाचे नियम वेगवेगळे असतील तर जाहीर करावेत. विद्यापीठ प्रशासन माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीची पूर्णपणे माहिती देत नाही त्यामुळे माहिती आयुक्तांनी विद्यापीठास दंड केला असल्यास त्याचा खुलासा देखील करावा व विद्यापीठावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये? अशी विचारणा जर केली असेल तर माहिती साठी खुलासा करणे उचित होईल. मागील कुलसचिव बी .बी पाटील यांच्या राजीनामा संदर्भात देखील असलेले रेकॉर्ड श्वेत पत्रिकेच्या रूपाने जाहीर करण्याचे आव्हान केले आहे. नवीन कुलसचिव नियुक्त करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी तसेच कुलसचिव पदासाठी बेसिक वेतन हे शासनाच्या नियमानुसार 8 हजार आहे तरी आपल्या विद्यापीठात कुलसचिव यांना 12 हजार रुपये कसे? या बाबत देखील खुलासा करण्याची मागणी केली आहे.
चौकशी समित्या फक्त नावाला?
वित्त लेखा अधिकारी हे एका संस्थेतून सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांच्या ऐवजी विद्यापीठ परिक्षेत्रात एकही लायक अधिकारी किंवा प्राध्यापक का मिळू शकला नाही? विद्यापीठाने उपवित्त लेखाधिकारी यांच्याकडे पदभार दिला होता तो त्यांनी स्वेच्छेने परत दिल्याबद्दलची माहिती ही शंकास्पद वाटते. सायंकाळी 5 वाजता त्यांच्याकडून पदभार काढून घेतल्याची दबक्या आवाजात चर्चा देखील विद्यापीठात होती. निवृत्त प्राचार्य किवा प्राध्यापक यांची अशी नियुक्ती करण्याची तरतूद विद्यापीठ कायद्यात कोठे दिली आहे? याबाबत खुलासा करावा. निवृत्त न्यायाधीश व्यवहारे यांनी कोणाच्या जाचाला कंटाळून चौकशी अधिकारी पदाच्या राजीनामा दिला याचा खुलासा करावा. विद्यापीठात कोणकोणत्या चौकशी समिती स्थापन होऊन त्या फक्त नावालाच तयार होऊन त्यांच्या चौकशी अधिकार्यांनी राजीनामे दिलेत? कीवा कोणता अहवाल त्यांनी चौकशी करून सादर केला? व त्या चौकशीत दोषी आढळलेल्या दोषींवर विद्यापीठ प्रशासनाने काय कारवाई केली याचा देखील खुलासा विद्यापीठ प्रशासनाने करण्याचे सांगितले आहे.
खुल्या चर्चेचे आव्हान
विद्यापीठात विविध विचारसरणीचे प्राध्यापक, प्राचार्य यांची कुणाच्या आदेशाने प्रमुख समित्यांवर नेमणूक केली आहे. त्यांच्याबाबत ती तरतूद देखील जाहीर करावी. समित्या कुठल्या व नियुक्त असलेले प्राध्यापक कोण याचा खुलासा करावा अशी मागणी केली आहे. विद्यापीठात दिले जाणारे कंत्राट हे कोणाला व कोणाच्या शिफारसीने कोणत्या ठेकेदाराला देण्यात आले? विद्यापीठातील अधिकारी गौड यांना पदावरून का काढण्यात आले? याचा खुलासा करावा तसेच वित्त अधिकारी कराड यांच्या कामकाजात काय कमतरता होती की त्यांना पदावरून कमी केले त्याचा खुलासा देखील विद्यापीठ प्रशासनाने करावा. विद्यापीठातील बेकायदेशीर व मनमानी कारभाराचा खुलासा करावा किंवा विद्यापीठ प्रशासन व विद्यार्थी संघटना यांना खुल्या चर्चेसाठी कागद पत्रांसोबत खुल्या चर्चेत पाचारण करण्यात यावे असे प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे. प्रसिद्धी पत्रावर अॅड. कुणाल पवार माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, भुषण भदाणे, अध्यक्ष फार्मसी स्टूडेंट कौन्सिल, गौरव वाणी, अभिषेक पाटील यांच्या सह्या आहेत.