पुणे : ‘द टाइम्स हायर एज्युकेशन’ने जाहीर केलेल्या इमर्जिंग इकोनॉमिक्स युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये जगात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 93 वा क्रमांक पटकाविला आहे. या यादीमध्ये भारतातून आयआयएस्सी, आयआयटी यांसारख्या केंद्रीय शैक्षणिक संस्थांनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्थान निश्चित केले आहे. पुणे विद्यापीठाने पहिल्या 100 मध्ये येण्याचा मान मिळविला आहे.
अध्यापन, संशोधन, ज्ञान व माहितीची देवाण-घेवाण, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, बाजारपेठ आणि उद्योगांच्या मागणीनुसार अभ्यासक्रमांमध्ये बदल अशा एकूण 13 मूल्यांवर गुणवत्ता यादी नुकतीच प्रसिद्ध केली. या यादीमध्ये 43 देशांमधील एकूण 442 विद्यापीठांसोबत शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. या यादीत यंदा देशातील एकूण 49 शैक्षणिक संस्था असून, गेल्या वर्षी ही संख्या 42 होती. त्यामुळे यंदा सात शैक्षणिक संस्थांचा समावेश झाला आहे. या यादीत चीनच्या एकूण 72 शैक्षणिक संस्थांचा समावेश असून, पहिल्या चार क्रमांकावरही त्यांचे वर्चस्व आहे.