विद्यापीठ, महाविद्यालये, परिसंस्था 14 एप्रिलपर्यंत बंद

0

लेखी व प्रात्यक्षिक परीक्षाही स्थगित

जळगाव – कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसर, संलग्नित महाविद्यालये व परिसंस्था येत्या १४ एप्रिलपर्यंत संपूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात सर्व शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी घरी बसूनच आवश्यक असेल ती कार्यालयीन कामे करावीत, असे निर्देश देण्यात आले आहे.

प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी शनिवार दि.२८ मार्च रोजी परिपत्रक काढले असून त्यामध्ये १४ एप्रिल पर्यंत शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरी राहून काम करावे असे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी ३१ मार्च पर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याचेआदेश होते.परंतु गृह विभाग, भारत सरकार व महाराष्ट्र शासनाकडून नव्याने आदेश प्राप्त झाले असून त्यानुसार विद्यापीठातील प्रशासकीय विभाग/प्रशाळा/वसतिगृहे तसेच अमळनेर, धुळे व नंदुरबार येथील उपकेंद्र १४ एप्रिल पर्यंत बंद राहतील. तसेच संलग्नित महाविद्यालये देखील या काळात बंद राहतील मात्र शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी घरी बसून या काळात शैक्षणिक व प्रशासकीय कामे करावीत.गरज भासल्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यालयात उपस्थिती बंधनकारक राहिल.

विद्यापीठाद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा १४ एप्रिल पर्यंत स्थगित करण्यात येत असून त्यानंतर परीक्षांच्या आयोजनाबाबत शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार वेळोवेळी आढावा घेऊन त्या अनुषंगिक सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील असे या परिपत्रकाद्वारे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.परीक्षांबाबत सोशल मिडियावर चुकीचे व दिशाभुल करणारे संदेश प्रसिद्ध होत असून त्यावर विश्वास न ठेवता संदेशाची सत्यता विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करावी, असेही विद्यापीठाने कळविले आहे.