विद्यार्थांमधील कलागुण जोपासा : शोभा कदम

0

खडकी : शालेय शिक्षणात मिळवलेल्या गुणांना महत्त्व न देता विद्यार्थांमधील कलागुणांना वाव दिल्यास आदर्श विद्यार्थी घडेल, असा विश्वास लायन्स क्लबच्या सदस्या अ‍ॅड. शोभा कदम यांनी व्यक्त केला. खडकी शिक्षण संस्थेच्या जीएमआय कन्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थीनींचा शाळेच्या वतीने नुकताच गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी लायन्स क्लबचे संजय सत्तुर, संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे, संगिता करडे, मुख्यध्यापिका साधना कोर्हाळे, मनिषा राठोड, वैशाली वाघ, ललिता काकडे, अरुण जाधव, दिलीप कांबळे यांसह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यंदाच्या शाळेचा निकाल 84.55 टक्के लागला. शाळेतील अदिती शेळकेने 90.80 टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकविला, तर कल्याणी देशमाने या विद्यार्थीनीने 83.40 टक्के गुण मिळवून दुसरा आणि इशा कुबडेने 82.20 टक्के गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळविला. या विद्यार्थीनींसह ऋतुजा तोडकर व सविता चौधरी अशा पाच विद्यार्थीनींचा तुळशीचे रोप देऊन अ‍ॅड. कदम व सत्तुर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका साधना कोर्‍हाळे यांनी केले. संयोजन ललिता वाकडे यांनी केले व सूत्रसंचालन दिलीप कांबळे यांनी केले.

रिक्षावाल्या काकांकडूनही गौरव
खडकी परिसरातील शालेय विद्यार्थांची ने-आण करणारे रिक्षावाले अरुण जाधव यांच्या वतीने शाळेतील पहिल्या आलेल्या तीन विद्यार्थीनींचा यावेळी पाचशे रुपये देऊन सन्मान करण्यात आला.