देहूरोड : देहू येथील रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयात कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित विज्ञान प्रदर्शनात 82 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी वेगवेगळे प्रयोग सादर केले. या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. शिल्पा मापूसकर-नारायणन् व देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याध्यापिका एस. डी. पवार, सह शिक्षिका वंदना पवार यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
विविध विषयांवर सादरीकरण
विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण डॉ. शिल्पा नारायणन् व डॉ. किशोर यादव यांनी केले. विद्यार्थ्यांच्या पालकांनीही या प्रदर्शनास भेट दिली. रेन वॉटर हार्वेस्टिंग, टाकाऊपासून टिकाऊ, वीजबचत, पाणी शुद्धीकरण आदी विषयावर आधारित प्रयोग सादर करण्यात आले. प्रेरणा उढाण (आठवी अ) या विद्यार्थिनीने ‘मनी प्रिंटर’ हा प्रयोग सादर केला. तर साक्षी प्रकाश भोसले (नववी अ) हिने ‘वॉटर लेव्हल सायरन’, ऋतुजा विकास नलावडे (नववी अ) हिने ‘स्टीम पॉवर जनरेटर’, तर पायल सुरेश सानप (सातवी अ) या विद्यार्थिनीने ‘ठिबक सिंचन’ हा प्रयोग सादर केला. या विद्यार्थिनींना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन अमित शिवळे यांनी केले.