विद्यार्थिनीला बेदम मारहाण करणारा शिक्षक निलंबित

0

पिंपरी-चिंचवड : दोन दिवस शाळेत आली नाही पाचवीच्या विद्यार्थिनीला अमानूष मारहाण करणा-या शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांनी घेतला आहे. श्रीकृष्ण केंगळे असे निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

चिखली, जाधववाडी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेची साई जीवन प्राथमिक शाळा आहे. पीडित विद्यार्थिनी या शाळेत इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत आहे. ती दोन दिवस शाळेत गैरहजर असल्यामुळे 21 डिसेंबर रोजी शिक्षक केंगळे यांनी विद्यार्थ्यांना तिच्या घरी पाठवून तिला शाळेत बोलावून घेतले होते. गैहजेरीबद्दल जाब विचारून तिला छडीने बेदम मारहाण केली होती. या विद्यार्थिनीच्या हातावर आणि दंडावर व्रण उमटले होते.उपशिक्षणाधिकारी पराग मुंढे यांनी शाळेला भेट देऊन त्याचा अहवाल तयार केला. त्यानंतर शिक्षण अधिकारी बी.एस.आवारी यांनी तो अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे सुपूर्द केल्यानंतर शिक्षक श्रीकृष्ण केंगळे यांना निलंबित करण्यात आले आहे.