विद्यार्थिनीवर हल्ला करणार्‍यास कठोर शिक्षा व्हावी

0

वाकड : यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील भाजपचे आमदार बोदकुरवार यांची कन्या अश्‍विनी बोदकुरवार हिच्यावर प्राणघातक हल्ला करणार्‍या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी कुठलाही कसूर न सोडता या प्रकरणासाठी अभ्यासू व चांगला सरकारी वकील नेमा. अश्‍विनीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, अशा सूचना शिवसेनेच्या उपनेत्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी वाकड पोलिसांना केल्या आहेत. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अश्विनीवर वाकड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. नीलम गोर्‍हे यांनी मंगळवारी (दि. 4) रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक राहुल कलाटे आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिस निरीक्षकांशी चर्चा
या घटनेनंतर डॉ. नीलम गोर्‍हे यांनी वाकड पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीधर जाधव यांच्याशी चर्चा केली. गुन्ह्यांची माहिती घेत सरकारी कागपत्रे पाहून सूचना दिल्या. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना हवे ते सहकार्य करण्याची शिवसेनेची भूमिका असल्याचे सांगितले.

शहरात 63 शैक्षणिक संस्था
पिंपरी-चिंचवड परिसरात 63 शैक्षणिक संस्था आहेत. या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केली जात आहे. पोलिस ठाण्यात सातत्याने तक्रारींची दखल घेणारी यंत्रणा राबविण्यात येत असल्याचेही पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले. संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत 150 पोलिस हद्दीत गस्त घालत आहेत. जर संस्थेने यापूर्वी झालेल्या प्रकाराची आम्हाला कल्पना दिली असती तर आम्ही लगेच कारवाई केली असती, असेही जाधव यांनी सांगितले.