विद्यार्थिनी, महिलांच्या छेडछाडीचे प्रकार वाढले!

0

रावेत : शहरातील शाळा-महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस अशा ठिकाणी टवाळखोरांचा त्रास वाढत आहे. टवाळखोर व रोडरोमियोंच्या छेडछाडीला विद्यार्थिनी, महिलावर्गाला सामोरे जावे लागत आहे. भीतीपोटी या प्रकारांसंदर्भात तक्रार करण्यास कुणीही पुढे येत नसल्याने टवाळखोरांचा त्रास दिवसेंदिवस वाढतच आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकारांकडे दुर्लक्ष केल्याने टवाळखोर, रोडरोमियोंची हिंमत वाढत आहे. अशा परिस्थितीत भविष्यात एखादी वाईट घटना घडली तर, त्यास जबाबदार कोण राहणार? असा संतप्त सवाल पालकवर्गाकडून केला जात आहे. पोलिसांनी टवाळखोरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

जाब विचारला तर दमबाजी
शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात टवाळखोर, रोडरोमियो नेहमी ठाण मांडून असतात. विद्यार्थिनींकडे पाहून अश्‍लिल हाव-भाव करणे, शेरेबाजी करणे, शिट्या वाजविणे, जोरजोरात आरडाओरड करणे, मोठ्या आवाजात गाणी म्हणणे, असे प्रकार यांच्याकडून सुरू असतात. दररोज विद्यार्थिनींची छेडछाड केली जाते. कुणी जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर दमबाजी केली जाते. नाहक वाद नको, आपले शिक्षण बंद होईल, या भीतीपोटी अनेक विद्यार्थिनी तक्रार करण्याचे धाडस करत नाहीत. त्यामुळे टवाळखोर व रोडरोमियोंचा त्रास वाढतच आहे.

विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण
चिंचवडगाव येथील फत्तेचंद महाविद्यालय, आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॅम्पस, म्हाळसाकांत महाविद्यालय, गोदावरी महाविद्यालय, कॅम्प एज्युकेशन या ठिकाणी हे प्रमाण अधिक आहे. याठिकाणी दररोज छेडछाडीच्या घटना घडतात. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टवाळखोर घोळक्याने रस्त्यावर थांबलेले असतात. त्यांना हटकले तर प्रवेशासाठी आलो आहे, मित्राला भेटायला आलो आहे, माझा दाखला काढायचा आहे, प्रवेशाची चौकशी करायची आहे, अशी उत्तरे दिली जातात. शाळा-महाविद्यालयांच्या आवारात विद्यार्थ्यांपेक्षा टवाळखोर, रोडरोमिओंची संख्या अधिक असते. यासंदर्भात अनेक तक्रारी करुनही पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याचा पालकवर्गाचा आरोप आहे.

संस्था चालकांचे कानावर हात
विद्यार्थिनी रस्त्याने जात असल्यास रोडरोमियो वेगाने दुचाकी चालवत त्यांना कट मारतात. अनेकदा चित्रविचित्र हावभाव करणे, इशारे करणे किंवा अश्‍लिल शब्द उच्चारून छेड काढणे, असे प्रकार घडत आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या रस्त्यावर असे प्रकार नेहमीच दिसून येतात. जवळपास सर्वच शैक्षणिक संस्था तसेच कोचिंग क्लासेस परिसरात छेडछाडीचे प्रकार होतात. हे प्रकार सर्व शैक्षणिक संस्थांच्या परिसरात सुरू असूनही संबंधित संस्था चालकांचे कानावर हात आहेत. पालक मुलींची बाजू असल्यामुळे हतबल असल्याचे दिसून येत आहे.

वेळेपूर्वीच टवाळखोर होतात हजर!
रोडरोमियोंचा कायम शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लास परिसरात वावर असतो. शाळा आणि क्लासेस सुटण्याच्या वेळेवर टवाळखोरांचे लक्ष असते. वेळेपूर्वीच ते हजर होतात. विद्यार्थिनी एकटी असेल, तर टवाळखोर तिची छेड काढतात. बहुतांश शैक्षणिक संस्थांमध्ये शहरातील ठराविक भागातील युवक टोळके करून उभे राहतात. त्यांच्याशी पंगा घेण्यास इतर विद्यार्थी घाबरतात. एखाद्या मुलीने पालकांना सांगितल्यास पालक तिला आजच्या दिवस शाळेत जाऊ नको, असे सांगून तिची समजूत काढतात. त्यामुळे रोडरोमिओंना चाप लागणे दूरच; पण विद्यार्थिनींमध्येच दहशत निर्माण झाली आहे.

पोलिसांकडे मनुष्यबळ कमी
शाळा, महाविद्यालये सुरू झाली की, रोडरोमियोंचा त्रास सुरू होतो. त्यामुळे जून महिन्यापासून निर्भया, दामिनी पथके कार्यरत होतात. शहरातदेखील अशी विशेष पथके आहेत. पण, शहरातील शैक्षणिक संस्थांची संख्या आणि पोलीस पथकांचे मनुष्यबळ यामध्ये कमालीची विसंगती आहे. शिवाय एकाच वेळी ही पथके सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊ शकत नाहीत. त्यामुळे रोडरोमियोंचे फावत आहे. पोलिसांचे वाहन पाहताच रोडरोमिओ पळ काढतात. पोलीस चक्कर मारून निघून गेले की, पुन्हा रोडरोमियोंचेच राज्य असते. बहुतांश शैक्षणिक संस्थांमध्ये असेच चित्र दिसत आहे.

नियमित पेट्रोलिंग सुरू
चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या शाळा, महाविद्यालय, क्लासेस आदी ठिकाणी भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस बीट मार्शल व बीट अधिकारी पेट्रोलिंग करीत आहेत. ज्या ठिकाणी अशा प्रकारचे टवाळखोर मुले आढळून येतात; त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे आमच्या हद्दीत छेडछाडीच्या प्रकाराला आळा बसला आहे, अशी माहिती चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिली.