जळगाव : शहरातील एका शाळेतील दहावीच्या विद्यार्थीनीला जबरदस्तीने दुचाकीवरुन पाळधी परिसरात पुन्हा घरी सोडणार्या शिक्षकाची विद्यार्थीनीच्या पालकांसह तिच्या नातेवाईकांनी यथेच्छ धुलाई केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याबाबत जिल्हा पेठ पोलिसांना विचारले असता कोणीही तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती त्यांनी दिली.
धास्तावलेल्या विद्यार्थीनीने आजीला सांगितले
ख्वॉजामिया परिसरातील एका शाळेतील एका शिक्षकाने रविवारी दहावीत शिकणार्या एका विद्यार्थिनीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि पाळधी परिसरात फिरायला घेऊन गेला. या विद्यार्थिनीने त्यास विरोेध केला असता त्याने गोड बोलून तुला लगेच घरी सोडतो असे सांगितले. काही वेळाने या शिक्षकाने विद्यार्थिनीला घराजवळ सोडले. घाबरलेल्या विद्यार्थिनीने हा प्रकार घरी आजीला सांगितला. आजीने तिच्या वडीलांनाही हा प्रकार सांगितल्यानंतर नातेवाईकांनी शाळेत जावून शिक्षकाची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शाळेत पेपर सुरु असल्याने चर्चा व बदनामी नको म्हणून शिक्षकांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. दुपारी विद्यार्थिनीचे वडील व काही संघटनांचे पदाधिकारी असे शाळेत आले. शिक्षकाची चौकशी करुन त्याला पटांगणात बोलावले. समोर येताच या लोकांनी शिक्षकाला बदडायला सुरुवात केली. कपडे फाटेपर्यंत या शिक्षकाला मारहाण झाली. हा शिक्षक पिंप्राळा भागातच वास्तव्याला आहे.
.