काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील एका शाळेत असलेल्या कार्यक्रमासाठी पालक आणि विद्यार्थी यांची ये-जा चालू होती. यावेळी त्याच शाळेतील 3 विद्यार्थी एका दुचाकीवर बसून चित्रपटांत दाखवतात त्याप्रमाणे वेडी-वाकडी वळणे घेत वाहन चालवत होते. यामुळे एका पालकाला वाहन चालवण्यात अडथळा येत होता. त्या वाहनावरील महिलेने त्या विद्यार्थ्यांना दटावले. याचा राग येऊन विद्यार्थ्यांनी त्यांची दुचाकी वळवून आणली आणि त्या पालकांच्या वाहनाला लाथ मारली. यात त्या वाहनाचा तोल जाऊन महिलेच्या डोक्याला पुष्कळ मार लागला.
पुढील उपचारासाठी नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. लहान-लहान मुलांमध्ये आलेली ही विकृती म्हणजे, हा चिंतेचा विषय बनला आहे. एवढी क्रूरता येतेच कुठून? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. हरयाणात मुख्याध्यापिकेने इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्याला शिक्षा दिली. त्याचा राग मनात धरून त्या विद्यार्थ्याने मुख्याध्यापिकेचा भोसकून खून केला. मागच्या वर्षी रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याने शाळेतील परीक्षा रद्द व्हावी, यासाठी त्याने इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्याचा खून केला होता. लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा, असे लहान मुलांच्या निरागसतेचे वर्णन आपल्या साहित्यात आहे. हीच लहान मुले पौगंडावस्थेत आले की, त्याचा खोडकरपणा वाढतो. हा खोडकरपणाही बर्याचदा कौतुकाचा विषय ठरतो. क्वचितप्रसंगी तो त्याला मार खायला लावतो. अशाच काही मुलांना टारगट असे विशेषण लागते. काही टारगट मुले भविष्यात पराक्रमी होतात, तर काही गुंड बनतात. स्वातंत्र्यसमरात अशाच मुलांनी मोठमोठे पराक्रम करून देशासाठी प्राण पणाला लावले. त्यावेळेचे वातावरणच निराळे होते.
आजची परिस्थिती मात्र निराळी आहे. हाणामारी करणारे चित्रपट, इंटरनेटवरवर उपलब्ध होणारे हिंसक व्हिडिओ, ब्लू व्हेलसारखे खेळ सध्या मुलांना आतून बाहेरून पोखरून टाकतात. खिसे कापण्यापासून हत्या करण्यापर्यंतचे एकप्रकारे प्रशिक्षणच दिले जात आहे. याचा दुष्परिणाम म्हणून पौगंडावस्थेतील मुलांमधील हिंसक वृत्ती बळावत आहे. भरधाव वेगाने वाहने चालवणे, एका दुचाकीवर 3 जणांनी बसून दुचाकी भरधाव पळवणे, रेसर बाइक खरेदीसाठी आई-वडिलांना आत्महत्येची भीती घालणे, ही बाइक मिळवल्यावर शर्यत लावून ती शहरातून बेदरकारपणे चालवणे, याविषयी कोणी काही बोलले, तर अरेरावी करणे, गुंडगिरी करणे सर्रास झाले आहे. सभोवताली भोगवादाला उत्तेजन देणारे प्रतीके, वस्तू, विषय अनेक झाली आहेत. त्यामुळे ज्या वयात मुलांमध्ये अभ्यास, शाळा, खेळ याविषयी कौतुक असणे गरजेचे होते, त्या वयात त्यांना अश्लील विषयांचे कुतूहल असते. त्या कुतूहलाच्या पोटी त्यांच्याकडून बलात्काराचे गुन्हे घडत आहे. शाळेत शिकवताना विद्यार्थ्यांच्या नजरा पाहून धक्का बसतो, अशा प्रतिक्रिया शाळांतील शिक्षिका देत असतात. हे सर्व बिघडत चाललेले वातावरण अत्यंत धक्कादायक आणि आश्चर्यजनक आहे. त्यामुळे तातडीने मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी आवश्यकता त्या उपाययोजना तातडीने करण्याची गरज आहे. अन्यथा हे वातावरण इतके बिघडेल की, त्यावर नियंत्रण मिळणे केवळ अशक्य होऊन जाईल.
– निलम पाटोळे
जनशक्ति, मुंबई
8451938235