राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न
पिंपरी-चिंचवड : मागील एक-दोन वर्षात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थी हितासाठी आंदोलने झाली. विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यात आल्या. तेच काम पुढेही अविरतपणे चालू ठेवण्यात येईल. सरकारने विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न व समस्या सोडविल्या पाहिजेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आगामी काळातही विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून काम करण्यावर आपला भर राहणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी दिली. शहरातील पक्ष कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक नाना काटे, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, विजय लोखंडे, सुनील गव्हाणे, उमेश काटे, विनोद भांगे, नारायण पाटील, अक्षय शेडगे, विशाल काळभोर, धैर्यशील धर्मे, युनिस शेख उपस्थित होते. या बैठकीत अजिंक्यराणा पाटील यांचा पदाधिकार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सरकारच्या धोरणांवर टीका
सरकारने विद्यार्थीवर्गाला जणू काही शिकू न देण्याचा कट रचल्याचे सांगत राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी डिपॉझिट म्हणून विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारे भरमसाठ शुल्क, विद्यार्थीवर्गाला शैक्षणिक कर्ज जाणूनबुजून उपलब्ध करून न देणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्त्या यावर अजिंक्यराणा पाटील यांनी टीका केली. तसेच शेतकरी कर्जमाफी, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव, सरकारची कर्जमाफीची ऑनलाईन प्रक्रिया यावर त्यांनी भाष्य केले.
आगामी काळात संघटन बांधणी
शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादीची धोरणे, राष्ट्रवादीने केलेली कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. यावेळी सुनील गव्हाणे यांनी पिंपरी-चिंचवड विद्यार्थी काँग्रेसकडून गेल्या वर्षभरात विद्यार्थीवर्गासाठी केलेल्या कामाची माहिती दिली. त्याचबरोबर येणार्या काळात बुथस्तरावर संघटना बांधणी करणार असून, ‘महाविद्यालय तेथे राष्ट्रवादी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन गणेश घाडगे यांनी केले.