विद्यार्थी घडविण्याचे शिक्षकांसमोर आव्हान – डॉ. देसाई

0
इंद्रायणी विद्यामंदिरात विविध पुरस्कारांचे वितरण
तळेगाव दाभाडे : आज शिक्षकांनी केवळ आपल्या विषयाचे ज्ञान न देता विद्यार्थ्यांची सर्वांगीण जडणघडण होण्यासाठी त्याला सर्वज्ञानी बनविणे गरजेचे आहे. महाराष्ट्राला लाभलेला फुले, शाहू, आंबेडकर यांचा वारसा पुढे नेण्याची व महाराष्ट्राचे पुरोगामित्व टिकविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांची आहे. बदलत्या काळानुसार विद्यार्थी प्रचंड बुद्धीमान होत चालला आहे. तर दुसरीकडे तो सोशल मीडियाची शिकार बनला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांना घडविण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास व राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी केले. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्यावतीने शिक्षकदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी डॉ. देसाई बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. यावेळी संस्थेचे खजिनदार केशवराव वाडेकर, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.बी.बी.जैन, डी.फार्मसीचे प्राचार्य जे.एस.शिंदे आदी उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा.डी.आर.साबळे, प्रा.एस.पी.भोसले, प्रा.एन.टी.भोसले, सुजाता चव्हाण यांना तर, शिक्षकेतर पुरस्कार एस.एस.तरटे, भक्ती दाभोळकर, राजेंद्र गायकवाड, वाय.डी.काळाणे यांना मिळाला.
कृष्णराव भेगडे यांनी सांगितले की मावळ तालुक्यात आज ठिकठिकाणी 65 महाविद्यालये उभी राहिली आहे. विविध विद्याशाखांचे शिक्षण घेण्याची सोय आज विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. शिक्षकांनी नैतिकता बाळगून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे. सूत्रसंचालन प्रा.के.व्ही.अडसूळ यांनी, तर आभार उपप्राचार्य प्रा.एस.एस.ओव्हाळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे प्रा.बी.के.रसाळ, प्रा.डी.पी.काकडे, प्रा.दिप्ती पेठे यांनी विशेष परिश्रम घेतले.