विद्यार्थी ते रावण सेना आणि अट्टल गुन्हेगार

0
पिंपरी-चिंचवड : आकुर्डी परिसरात दहशत पसरवणार्‍या रावण सेना टोळीचा म्होरक्या अनिकेत राजू जाधव  याचा पुर्ववैमनस्यातून  सहा जणांच्या टोळक्याने सोमवारी रात्री खून केला. अनिकेत निगडी परिसरातील एक महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होता. महाविद्यालयातच असताना तो गुन्हेगारीकडे वळला. या गुन्हेगारीतूनच त्याचा निर्घृण खून करण्यात आला.
अनिकेत जाधव (वय 22) रावेत येथील जाधव वस्तीत राहण्यास होता. त्याच्या घरची परस्थितीत बेताची आहे. त्याचे वडील सुरक्षा रक्षकाची नोकरी करतात. तर, आई धुणी भांड्याचे काम करते. अनिकेत निगडी येथील एका महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. शिक्षण घेत असताना त्याला महाविद्यालया बाहेरचा गुन्हेगारी स्वरुपाचा ग्रुप मिळाला. त्या ‘ग्रुप’कडे तो आकर्षित झाला आणि त्याच्या माध्यमातून तो गुन्हेगारीकडे वळला. अनिकेतने देहूरोडसह पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध धंदे लुटण्यास सुरुवात केली. त्यातून त्याला ’बक्कळ’ पैसा मिळाला. अवैध धंदा असल्यामुळे कोणीच पोलिसांकडे त्याच्याविरोधात तक्रार देण्यास धजावत नव्हते. कोणी पोलिसांकडे तक्रार देत नसल्यामुळे त्याची गुन्हेगारी वाढली. अवैध धंदे लुटून मिळालेल्या पैशातून त्याने स्वत:ची रावण सेना टोळी निर्माण केली. या टोळीच्या माध्यमातून तो विविध गुन्हे करु लागला.
अनिकेत देहूरोड ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार झाला. त्याच्यावर मारामार्‍या, दरोडा, खूनाचा प्रयत्न असे विविध गंभीर गुन्हे देहूरोड, चिंचवड आणि निगडी पोलीस ठाण्यात दाखल होते. काही दिवसांपूर्वीच त्याला निगडी पोलिसांनी जेरबंद केले होते. त्याच्याकडून पोलिसांनी तीन बेकायदेशीर बाळगलेली तीन पिस्तूले पकडण्यात आली होती. अनिकेत हा काही दिवसापूर्वी महाकाली टोळीचा म्होरक्या हनम्या ऊर्फ हनुमंत शिंदे याच्यावर गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणातील दाखल गुन्ह्यात फरार आरोपी होता. आकुर्डी परिसरात त्याने रावन सेनेच्या माध्यमातून दहशत माजविण्यास सुरुवात केली. त्यामुळे आकुर्डी परिसरातील सराईत गुन्हेगार सोन्या काळभोर आणि अनिकेत जाधव याच्या टोळीमध्ये भांडणे होऊ लागली. त्यातून त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले. या पुर्ववैमनस्यातून सोमवारी रात्री सोन्या काळभोर याने साथीदारांसह अनिकेत जाधव याचा तलवारीने सपासप वार करुन निर्घृण खून केला.