ठाणे : एकीकडे इंग्रजी शाळांचे वाढते फॅड तर दुसरीकडे मराठी शाळांची घटती पट संख्या रोखण्यासाठी मराठी शाळांनी कात टाकण्याची गरज व्यक्त होत आहे. ठाण्यातील मो.ह. विद्यालयाने मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना आकृष्ट करण्यासाठी शाळेतील वर्ग सुसज्ज करण्याचा फंडा लढवला आहे. तसेच ८ एप्रिलपर्यंत शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
उच्चभ्रू वर्गाबरोबरच सामान्य वर्गातील कुटुंबातही आपली मुले इंग्रजी माध्यमातून शिकण्याची इच्छा दिवसेंदिवस बळावत आहे. त्याचा परिणाम मराठी शाळांवर होत असून मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या रोडावत चालली आहे. परिणामी मराठी शाळांची स्थिती दयनीय होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी शाळांनी पारंपारिक स्थितीतून बाहेर येऊन कात टाकण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्या दृष्टीने ठाण्यातील प्रसिद्ध मो.ह. विद्यालयाने यासाठी पुढाकार घेतला आहे. शाळा व्यवस्थापनाने नानाविध क्लृपत्या लढविल्या आहेत. शाळेत मिनी शिशु वर्गापासून ते इयत्ता ४ थी पर्यंतच्या वर्गात विना डोनेशन प्रवेश देण्यास सुरुवात केली असून ८ एप्रिलपर्यंत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेट वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठी भाषा ही मराठी माध्यमांच्या शाळांच्या अस्तित्वाचा कणा आहे. त्यामुळे मराठी शाळा ह्या टिकल्या पाहिजेत. अशा परिस्थिती इंग्रजी शाळांचे मराठी शाळांवर होणारे आक्रमण रोखण्यासाठी व मराठी माध्यमाच्या शाळा वाचविण्यासाठी मो.ह. विद्यालयाच्या प्राथमिक विभागाने प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान, मो.ह. विद्यालयातील पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याधापक सुनील पाटील व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी शाळेच्या आसपासच्या भागात घरोघर फिरून पालकांचे जनजागरण करण्याचा मार्ग अनुसरला आहे. शहरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर शाळा प्रवेशाच्या जाहिरातींचे फलक लावण्यात आले आहेत. त्या जाहिरातींमध्ये मिनी शिशु वर्गापासून ते इयत्ता ४ थी पर्यंतच्या वर्गात ८ एप्रिलपर्यंत प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना आकर्षक भेट वस्तू देण्याचा उल्लेख करण्यात आला असून विना डोनेशन प्रवेश देण्यात येत असल्याचे ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. मराठी शाळांमध्ये सेमी इंग्रजी व इंग्रजी विषय प्रभावीपणे शिक्षण शिकवण्याचे शाळेने ठरवले आहे. त्याचप्रमाणे आणखी काही उपक्रम राबवून मराठी शाळांचे अस्तित्व वाचवून त्यांना उर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा मनोदय शाळा व्यवस्थापनाने व्यक्त करीत मराठी भाषिक कुटुंबे मराठी शाळांमध्ये प्रवेश घेण्याला प्राधान्य देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.