महाविद्यालयीन विद्यार्थी प्रतिनिधींची निवड

0

जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत येणार्‍या महाविद्यालयाच्या प्रतिनिधी पदाकरीता शुक्रवार 5 रोजी निवडणूक घेण्यात आली. चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांमधून प्रतिनिधींची निवड करण्यात येत असते. बुधवारपासून वर्ग प्रतिनिधींची यादी महाविद्यालयांनी जाहीर केले होते. त्यातून महाविद्यालयीन प्रतिनिधींची निवड करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत येणार्‍या महाविद्यालयांमध्ये ही निवडूक घेण्यात आली. चिठ्ठी टाकुन मतदान करण्यात आले. सकाळी 11 वाजता महाविद्यालयात ही निवडणूक घेण्यात आली. शहरातील रायसोनी मॅनेजमेंट, बाहेती व जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालया अशा तीन महाविद्यालयातून विद्यार्थींनीची निवड करण्यात आली आहे.

15 सदस्यांची निवड
निवडणूकीनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष व सहसचिव नावांची यादी विद्यापीठाला 8 जानेवारीपर्यत पाठवावी लागणार आहे. 9 जानेवारी रोजी कुलगुरु महाविद्यालयांकडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींमधून 15 सदस्यांची (15 पेक्षा जास्तही असण्याची शक्यता) निवड विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी करणार आहेत. 11 किंवा 12 जानेवारी रोजी विद्यापीठांकडून कुलगुरु नियुक्त सदस्यांची निवडणूक घेऊन विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षांची निवड करणार आहे.

मू.जेतून शुभम भोंगळे
मू.जे.महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधीच्या निवडणूकीत अपक्ष उमेदवार शुभम रामेश्‍वर भोंगळे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. त्याला 10 मते मिळाली. मू.जे.महाविद्यालयात 5 विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 1 अर्ज अवैध ठरविण्यात आले. उर्वरीत चार वैध उमेदवारांसाठी निवडणूक घेण्यात आली. मू.जे.महाविद्यालयात एकुण 31 जणांनी मतदान केले. सर्व निवडणूक प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. उमेदवारी घेतांना विद्यार्थ्यांकडून त्यांच्या कल्पना जाणून घेण्यात आल्या.

युवा सेनेचा दावा
शासकीय अभियांत्रिकीतून समर्थ कुलकर्णी याची बिनविरोध निवड झाली तर बांभोरी येथील एस.एस.बी.टीतून संपदा बारी याने विजय मिळविला. हे उमेदवार युवासेनेचे असल्याचा दावा प्रितेश ठाकुर याने केला आहे.

रायसोनीतून श्रद्धा चावला
जी.एच.रायसोनी इन्स्टीट्युट ऑफ बिझनेस मेनेजमेन्टमध्ये विद्यापीठ प्रतिनिधीसाठी निवड घेण्यात आली. यावेळी एकूण 17 प्रतिनिधींच्या सर्वानुमते श्रद्धा अशोक चावला (प्रथम वर्ष एम.बी.ए) या विद्यार्थिनीची विद्यापीठ परिषद सचिव या करिता बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून आकृती साहनी, क्रीडा प्रतिनिधी चेतन फुलवानी व सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून गौरव देशमुख यांची निवड झाली आहे. संपूर्ण निवड प्रक्रिया संचालिका डॉ.प्रिती अग्रवाल यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रा.मकरंद वाठ, डॉ.दीपक शर्मा व विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.राज कांकरिया यांनी जबाबदारी सांभाळली.

बेंडाळेतून ऐश्‍वर्या बडगुजर
बेंडाळे महिला महाविद्यालयातून विद्यापीठ परिषद सचिव म्हणून ऐश्‍वर्या परशुराम बडगुजर या विद्यार्थींनीची निवड झाली. त्याला 17 मते मिळाली. बेंडाळे महिला महाविद्यालयात झालेल्या निवडणूकीकरीता 4 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी नेहा अनिल शिंपी या विद्यार्थींनीचा अर्ज बाद ठरला. एैश्‍वर्या बडगुजर (17), सुषमा भेरे(04), माधुरी बारी(06) या तीन विद्यार्थींनींमध्ये लढत झाली. त्यात एैश्‍वर्या बडगुजर हीने विजय मिळविले. एकुण 34 मतदार होते. त्यापैकी 27 मतदारांनी मतदान केले. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रा.नंदा बेंडाळे, प्रा.डॉ.एस.एस.चौधरी, प्रा.डॉ.अनिता कोल्हे यांनी पार पाडली. विजयी विद्यार्थींनीचे प्राचार्य डॉ.एस.एस.राणे, उपप्राचार्य प्रा.बी.पी.सावखेडकर यांनी सत्कार केला.

आयएमआरमधून गवळी
के.सी.ई.सोसायटी संचलीत आय.एम.आर.महाविद्यालयातून विद्यापीठ परिषद सचिव म्हूणन राहुल बबलु गवळी या विद्यार्थ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. एकुण 29 मतदार आ.एम.आर.महाविद्यालयात होते. डॉ.शिल्पा बेंडाळे यांच्या उपस्थितीत निवड जाहीर करण्यात आली. प्रा.योगेश पाटील, प्रा.निलीमा पाटील, प्रा.एस.एस.खान, प्रा.एस.एन.कुलकर्णी आदींनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. निवडणूक बिनविरोध व्हावे यासाठी महाविद्यालयाच्या प्राध्यापक वृध्दांनी परिश्रम घेतले.

उमवीत युवासेनेचा गोविंद पाटील
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेच्या सचिव पदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणूकीत यु.आय.सी.टी.चा विद्यार्थी गोविंद पाटील हा निवडून आला. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 यात सुधारणा करण्याकरिता 28 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने अध्यादेश प्रसिध्द केला होता. त्या अध्यादेशातील कलम 99, उपकलम (3) नुसार विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद सदस्यांमधून सचिव पदाच्या निवडीसाठी शुक्रवार 5 जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बौठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. या बैठकीत सचिव पदाच्या निवडणूकीसाठी तीन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. बैठकीला 36 पैकी 34 सदस्य उपस्थित होते. त्यामुळे निवडणूकीनंतर विजयासाठी 17 मतांचा कोटा निश्‍चित करण्यात आला. पूर्वा जाधव (केमिकल सायन्सेस्) विद्यार्थिनीला पहिल्या फेरीत 14 मते, कल्पना मोते (सामाजिकशास्त्रे विभाग) या विद्यार्थिनीला 9 मते आणि गोविंद पाटील (युआयसीटी) या विद्यार्थ्याला 10 मते पडली. कल्पना मोते ही पहिल्या फेरीत बाद झाल्यामुळे तिच्या दुसर्‍या पसंतीच्या मतांची मोजणी केली असता गोविंद पाटीलला 7 तर पूर्वा जाधवला 2 मते स्थानांतरीत झाली. 17 मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे गोविंद पाटील यास विजयी घोषित करण्यात आले. या निवडणूक प्रक्रियेसाठी कुलसचिव बी.बी.पाटील, सहाय्यक कुलसचिव आर.बी.उगले व एन.जी.पाटील यांनी सहकार्य केले. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी गोविंद पाटील याचा सत्कार केला. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा.एस.टी.इंगळे उपस्थित होते.

संस्थाध्यक्ष पुत्र विजयी
विद्यापीठ परिषद सचिव पदाकरीता घेण्यात आलेल्या निवडणूकीत जळगाव शहरातील महाविद्यालयांमध्ये मराठा विद्याप्रसारक मंडळ संचलित नुतन मराठा महाविद्यालयाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची व उत्साहाची ठरली. कारण अपक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक नरेंद्र पाटील यांचे चिरंजीव पियुष पाटील याने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अभाविपतर्फे आकाश धनगर व अपक्ष म्हणून पियुष पाटील याने उमेदवारी दाखल केली. मात्र आकाश धनगर याच्या उमेदवारी अर्जातील चुकांमुळे अर्ज बाद ठरविण्यात येऊन संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक नरेंद्र पाटील यांचे चिरंजीव पियुष पाटील याची बिनविरोध निवड करण्यात आली. दुपारी 1.30 वाजता निकाल जाहीर करण्यात आला. निवड जाहीर होण्यापूर्वीच पियुष पाटील याच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी व फटाक्याची आतिषबाजी सुरु केली होती. निवड घोषीत झाल्यानंतर महाविद्यालय परिसरात जल्लोष करण्यात आला.

सुरुवातीला पाच अर्ज प्राप्त झाल्यानंतर सर्व उमेदवारांना बिनविरोध निवडणुक घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांना चर्चा करण्याची संधीही देण्यात आली. मात्र त्यांच्यात सहमत होऊ शकले नाही. त्यामुळे शेवटी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अतिशय पारदर्शकरित्या घेण्यात आली. उमेदवारांसमोर निवडणूक प्रक्रिया पार पडली.
– उदय कुलकर्णी-प्राचार्य मू.जे.महाविद्यालय

माझ्या अर्जाप्रमाणे पियुषच्या अर्जातही चुका होत्या. मात्र पियुष हा संस्थाध्यक्षांचा पूत्र असल्याने महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह प्राध्यापकांनी त्याची बाजु घेतली व माझ्यावर दबाव आणून माझा अर्ज बाद केला. प्राध्यापक वर्गाने सर्वांना समान वागणुक दिली पाहिजे होती, मात्र संस्थाध्यक्षांच्या दबावाला बळी पडून त्यांनी माझ्यावर अन्याय केला. लोकशाहीसाठी हे मारक आहे. आम्ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नव्हतो.
-आकाश धनगर,अभाविप उमेदवार