आंदर मावळात प्रा. मोरे महाविद्यालयातर्फे वनस्पती निरीक्षण
रावेत : आकुर्डीतील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय वनस्पती निरीक्षण उपक्रमाचे आयोजन आंदर मावळात करण्यात आले होते. जैविक, सूक्ष्मजीवी, जिवाणू, किटकभक्षी अशा वनस्पतींच्या विविध जाती-प्रजातींची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. वनस्पतींची वाढ, वाढीसाठी त्यांना लागणारे पोषक वातावरण, मातीचे वेगवेगळे प्रकार याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती घेत निरीक्षण नोंदविले. तृतीय वर्ष व पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग नोंदवला.
जैवविविधतेचा वारसा जपा
पुणे जिल्ह्यात आढळणारे विविध प्राणी, पक्षी, किटक, वनस्पती यांच्या जातींची विविधता प्रा. किशोर सस्ते व राजेश नागरे यांनी सचित्र वर्णन मांडली. आपल्याकडे जैवविविधतेचा मोठा वारसा असून, आपल्याला तो जपण्याचे काम करायचे आहे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या निरीक्षण सहलीचे आयोजन प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. बाजीराव शिंदे, प्रा. राजेश नागरे, प्रा. किशोर सस्ते, डॉ. हिरालाल सोनावणे, ज्ञानेश्वर भंडारे यांनी केले होते.
महाविद्यालयाने आमच्यासाठी वनस्पती निरीक्षण उपक्रमाचे आयोजन केल्याने खूप मोलाची माहिती मिळाली. आपल्या जवळच असलेल्या वनस्पतींचा ठेवा आम्हाला माहिती झाला.
-ऐश्वर्या टोणगे, विद्यार्थिनी
फक्त पुस्तकी ज्ञान न देता क्षेत्रभेटी देऊन आमच्या ज्ञानात महाविद्यालयाने अनोखा उपक्रम राबविला. विविध वनस्पतींची पुरेपूर माहिती मिळाली. पर्यावरण संवर्धनाविषयी नक्की जनजागृती करू.
-धनंजय भोसले, विद्यार्थी