जळगाव : केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित सेवावस्ती विभागाच्या हरिविठ्ठल नगर येथील विद्यार्थी विकास केंद्राचे दोन दिवसीय निवासी शिबीर संपन्न झाले. हे शिबीर मातोश्री आनंदाश्रमाच्या निसर्गरम्य परिसरात घेण्यात आले. यात वस्ती भागातील 30 मुला – मुलींचा समावेश होता. शिबिराच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर आनंदाश्रमाच्या प्रकल्प प्रमुख अनिता कांकरिया, मानव संसाधन विकास विभागाचे हेमंत भिडे, व्यवस्थापिका स्नेहा तायडे उपस्थित होत्या. अनितादीदींनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधतांना त्यांनी संस्काराची त्रिसूत्री विशद केली.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण
शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध सामूहिक खेळ, चित्रकला स्पर्धा, योगाभ्यास, झुंबा डान्स, शैक्षणिक चित्रपट तसेच नाटिका सादर करून आनंद साजरा केला. शिवाय आनंदाश्रमातील आजी – आजोबांसोबत गप्पा गोष्टींच्या माध्यमातून त्यांचे अनुभव आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. ’आश्रय – माझे घर’, विवेकानंद प्रतिष्ठानचे निवासी विभागात भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली. त्यांना आजी – आजोबांचे मिळाले प्रेम आणि माया यामुळे निरोप प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झाले होते. योगा आणि झुंबा नृत्य शिवानी खोडपे यांनी घेतले. कृणाल महाजन यांनी सूत्रसंचालन केले. तर विद्यार्थी विकास केंद्रातील शिक्षिका ज्योती बारी, मंगला अहिरे, आशा गरुड आदींनी सहकार्य केले.