विद्यार्थी हितविरोधी धोरणाचा युवासेनेकडून निषेध

0

धुळे । शासनाच्या विद्यार्थी हितविरोधी धोरणाचा निषेध म्हणून युवासेनेने आयोजित केलेल्या प्रतिकात्मक पुतळा दहनाला ऐन वेळी पोलिसांनी मज्जाव केला. त्यामुळे पुतळा दहन टळले असले तरी आंदोलन मात्र सुरुच राहणार असल्याचे युवासेनेने जाहीर केले आहे. शासनाने धुळ्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषि विद्यापिठ धुळ्यात होण्याचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या उपकेंद्रासाठी देवपूरमधील सर्व्हे नं.111 व 112या जागेचा ठराव झालेला असतांना तो विखंडीत करणे या धोरणांचा युवासेनेने निषेध केला आहे.

पदाधिकारी- पोलिसांत झटापट

अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी राज्यात एकच विद्यापिठ असावे अशी मागणी करीत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून देवपूरातील उमवि उपकेंद्राच्या जागेवर शासनाच्या प्रतिकात्मक पुतळा दहनाचे युवासेनेने जाहीर केले होते. पुतळ्यासह युवासेनेचे पदाधिकारी व विद्यार्थी तेथे जमले असता पोलिसांनी येवून दहनाचा पुतळा ताब्यात घेतला. यावेळी युवासेना पदाधिकारी आणि पोलिसांत झटापट ही झाली. मात्र जाळण्या आधीच पुतळा ताब्यातघेण्यात आणि विद्यार्थ्यांना पिंजरा गाडीत कोंबून घेवून जाण्यात अखेर पोलिस यशस्वी ठरले.या आंदोलनात युवासेनेचे पंकज गोरे सह संदीप मुळीक, हरीश माळी,मनोज जाधव, अमित खंडेलवाल,जितेंद्र पाटील, नितीन मराठे,स्वप्निल सोनवणे, दीपक देसले यांच्या सह विद्यार्थी सहभागी झाले होते.