जळगाव। एसएसबीटी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी रजनीश कुमार, दिपक वाघ, लक्ष्मण भोयेवर, कृष्णा शिंदे, अरुण इसापुरे यांनी विभाग प्रमुख प्रा.डॉ.एम. हुसेन यांचे सहकार्य आणि प्रा.फारूक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन बिल्डिंग कार्यक्षमता मूल्यमापनाचा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला. मर्यादित प्रमाणात साठा असणार्या पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा भरमसाठ वापरामुळे भविष्यात जगापुढे होणार्या ऊर्जा निमिर्तीच्या आव्हानाला पर्यायी भाग म्हणून सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करणे गरजेचे आहे. जळगाव सारख्या उष्ण तापमान असलेल्या भागातील घराच्या भिंतीसाठी वेगळा पर्याय म्हणून कॅव्हिटी वॉल चा उपयोग केल्यास घरातील तापमान कमाल 35 टक्के कमी होते.
ग्रीन बिल्डिंगचे फायदे
ग्रीन बिल्डिंग बांधकामाचा खर्च जरी सामान्य बिल्डिंगच्या खर्चा पेक्षा 5 टक्के जास्त असला तरी, किमान 4 वर्षात परतफेड होते. पारंपारीक ऊर्जास्रोतांचा वापर कमी होतो, विजेचा वापर कमी होतो,, पाणी संवर्धन होते, जमिनीखालील पाण्याच्या पातळीत वाढ होते. वास्तुशास्त्रानुसार खिडक्या आणि दरवाज्याची रचना केल्यास हवा खेळती राहते आणि दिवसा सूर्यप्रकाशाच्या वापरामुळे विजेची बचत होते. आम्ही स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विद्यार्थी असल्यामुळे आमचा संबंध बांधकाम व्यवसायाशी जास्त प्रमाणात असला तरी, स्थापत्य शात्राचा मुख्य उद्देश हा कमीत कमी खर्चात आधुनिक व पर्यावरणपूरक संकल्पनांचा उपयोग करणे असा आहे.