विद्यार्थ्यांची हजेरी अद्यापही ऑफलाइनच

0

पुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन हजेरीसाठी मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात आले. या अ‍ॅपचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत 26 नोव्हेंबरला झाले. घाईमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून टाकण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात अजूनपर्यंत हे अ‍ॅप कार्यान्वित करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची हजेरी ही ऑफलाइनच सुरू आहे.

अधिकार्‍यांच्या बदल्यांनंतर शिक्षण विभागाच्या कामांना गती आली. या गतीमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी टेक्नोसॅव्ही करण्यासाठी मोबाइल अ‍ॅप तयार करण्याची संकल्पना पुढे आली. पदाधिकार्‍यांनी सूचना दिल्या, अधिकार्‍यांनी तत्काळ अंमलबजावणी केली, परंतु अ‍ॅपचे काम पूर्ण न करताच घाई गडबडीत उद्घाटन उरकले. अ‍ॅपचे काम पूर्ण झालेच नव्हते, तर अधिकार्‍यांनी एवढ्या घाईमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम का उरकला, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या नवीन अ‍ॅपद्वारे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची हजेरी एका क्लिकवर मुख्यालयात समजणार आहे. आरोग्य विभाग, पाणी व स्वच्छता विभागाकडून अ‍ॅप तयार केल्यानंतर शिक्षण विभागाने तयार केलेले मोबाइल अ‍ॅप फायदेशीर ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लवकरच काम पूर्ण होईल

मोबाइल अ‍ॅपमध्ये कोणत्या-कोणत्या सुविधा असणार आहेत, यासंदर्भात काम सुरू आहे. गेल्या महिन्यात अ‍ॅपचे उद्घाटन झाले आहे. अ‍ॅप अजून कार्यान्वित करण्यात आलेले नाही. येत्या काही दिवसांमध्ये मोबाइल अ‍ॅपचे काम पूर्ण होईल.                                                                   सुनील कुर्‍हाडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद