विद्यार्थ्यांचे अंतरंग निकोप ठेवण्याची पालक, शिक्षक, परिसराचीही जबाबदारी

0

पोलादपूर । तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक घटक विद्यार्थी जीवनावर सातत्याने प्रभाव निर्माण करत असते. आता विद्यार्थ्यांचे अंतरंग निकोप ठेवण्याची पालक, शिक्षक, परिसराचीही जबाबदारी निर्माण झाली आहे, असे मत महाड येथील विख्यात राष्ट्रीयस्तरावरील बालरोगविषयक तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी व्यक्त केले. किशोरवयीन मुलांच्या आरोग्याची काळजी सप्ताहानिमित्त पोलादपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिरामध्ये आयोजित व्याख्यानावेळी दाभाडकर बोलत होते. विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींची उंची आधीच कमी वयात वाढते आणि ही वाढ मुलांची उंची वाढण्याचे वय सुरू होण्यापूर्वीच थांबते.

मुलींचा वयात येण्याचा वयोगट कमी असल्याने एकाच वर्गातील विद्यार्थिनी पुर्णत: विकसित असतात आणि विद्यार्थी तुलनेत कमी विकसित असतात. मात्र, त्यानंतर मुलांची शारीरिक वाढ होत जाते आणि ती वयाच्या 17-18 वर्षांपर्यंत झपाट्याने वाढते. अशी माहिती यावेळी देत दाभाडकर यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या याच विकास प्रक्रियेदरम्यान परिसर, पालक, समाज, शिक्षक यांनी सतर्क आणि जबाबदारीने वागण्याची गरज असून पालकांनी शिक्षकाची तर शिक्षकांनी पालकांचीही भूमिका घेण्याची गरज वेळप्रसंगी निर्माण होत असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर डॉ. राजेश शिंदे, डॉ.राजेंद्र पाटील, डॉ. समीर साळुंखे, डॉ.पल्लवी साळुंखे, डॉ.नितीन मपारा, उपमुख्याध्यापक मुळे, पर्यवेक्षिका अस्मिता तलाठी होते. यावेळी शाळा समितीचे सभापती निवास शेठ यांनी अध्यक्षस्थान भूषवले होते.