जळगाव। मू. जे. महाविद्यालयात सध्या पदवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून शनिवारी एका विद्यार्थ्याची दोन मोबाइल ठेवलेली एक बॅग चोरली गेल्याची घटना सायंकाळी 4 वाजता उघडकीस आली. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मू. जे. महाविद्यालयात शनिवारी कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सामान्यज्ञानाचा पेपर होता.
त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या बॅग वर्गाबाहेर ठेवल्या होत्या. अभिषेक रवींद्र सोनवणे, तुषार दिलीप सूर्यवंशी दोन्ही रा. पाचोरा यांनी एकाच बॅगमध्ये मोबाइल ठेवले. काही वेळाने 2014 वर्षीचा प्रवेश असणारा जुना विद्यार्थी त्या ठिकाणी आला. त्याने अभिषेक याच्या बॅगमध्ये जबरदस्तीने त्याचा मोबाइल ठेवला. त्याला अभिषेक याने विरोध केला. मात्र त्याने ऐकले नाही. परीक्षा सुरू झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी बॅगेत मोबाइल ठेवणारा विद्यार्थी पेपर देऊन वर्गाबाहेर गेला. पेपर सुटल्यानंतर अभिषेक बॅग घेण्यासाठी गेला. मात्र बॅग गायब होती. त्याने शोध घेतला मात्र बॅग सापडली नाही. तसेच आणखी दोन विद्यार्थ्यांची आणि एका विद्यार्थिनीची बॅगही जागेवर नव्हती. त्यांनी शोध घेतला. त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची बॅग महाविद्यालयाच्या इमारतीच्या मागच्या बाजुला फेकलेली आढळली. तर अभिषेक याची बॅग चोरीला गेली होती. याप्रकरणी अभिषेक याने रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.