Ragging of ‘those’ students in Navodaya in Bhusawal: Report submitted by the principal to the police
भुसावळ : शहरातील जळगाव रोडवरील जवाहर नवोदय विद्यालयात दहावीच्या सात मुलांचे रॅगिंग झाल्यानंतरही विद्यालय प्रशासनाने घटना दडपल्याच आरोप पालकांनी करीत पोलिस उपअधीक्षकांकडे तक्रार केली होती. या संदर्भात माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर शाळा प्रशासनाने दोन विद्यार्थ्यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन केले होते तर पोलिस उपअधीक्षकांनी सात दिवसात अहवाल देण्याची तंबी प्राचार्य आर.आर.खंडारे यांना दिल्यानंतर त्यांनी गुरुवार, 13 रोजी अहवाल सादर केला असून त्यात विद्यार्थ्यांचे रॅगिंग झाल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. दरम्यान, पोलिस आता पुढील कारवाई केल्यानंतर हा अहवाल बाल न्याय मंडळाकडे सुपूर्द करणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.
बारावीच्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंग
4 ऑक्टोंबर 2022 रोजी शहरातील जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंगची घटना घडली मात्र विद्यालय प्रशासनाने ती दडपल्याचा आरोप होता. बारावीच्या दोन विद्यार्थ्यांनी दहावीच्या सात मुलांना बेदम मारहाण केली तर या घटनेत एका मुलास अधिक मार लागल्याने त्यास पालकांनी उपचारार्थ हलवले होते. दरम्यान, मारहाण करणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मार बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे माफी मागितल्यानंतर घटनेचा उलगडा झाल्यानंतर विद्यालय प्रशासनावर टिकेची झोड उठली होती.
बाल न्याय मंडळांकडे अहवाल सोपवणार
मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याने डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे लेखी पत्र देत तक्रार नोंदवल्यानंतर प्राचार्यांकडे अहवाल मागवण्यात आला. गुरुवारी प्राचार्यांनी अहवाल सोपवला असून त्यात विद्यार्थ्यांचे रॅगिंग झाल्याचे मान्य करण्यात आले आहे. शहर पोलिसांच्या माध्यमातून पुढील प्रक्रियेअंती हा अहवाल जळगाव येथील बाल न्याय मंडळाकडे सादर करण्यात येईल तसेच या प्रकरणाची पुढील चौकशी आता पोलिसांकडून सुरू होईल, असे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे म्हणाले.