विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा सोहळा

0

मनोर । पालघर-मनोर येथील लाल बहादूर शास्त्री हायस्कूलमध्ये गुरुवार 8 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या आरंभी दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी जनरल एज्युकेशन सोसायटी, मनोरचे उपाध्यक्ष सुनील लोखंडे, सचिव प्रविण चाफेकर, सदस्य संतोष लोखंडे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. लाल बहादूर शास्री हायस्कूलचे उपमुख्याध्यापक शरद महाजन, मुख्याध्यापक जाधव, जेष्ठ शिक्षक सुतार, हाडळ या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रमात 140 विद्यार्थ्यांकडून कलागुण सादर
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील कलागुण विकसित व्हावेत, या उद्देशाने शाळेच्या प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी कला, क्रीडा, विज्ञान महोत्सवाचे आयोजन उत्साहाने करतात. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समूहनृत्य, देशभक्तीवरील नाटिका, विनोदी नाटक, तारपा नृत्य, वंदे मातरम् गीत, लोक गीते या प्रकारचे उत्तम सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रम सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. प्रेक्षकांनी कार्यक्रमास भरभरून दाद दिली. या कार्यक्रमात 140 विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. याच महोत्सवाच्या उद्देशाने शाळेत चित्रकला, हस्तकला, रांगोळी व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उत्तर व्यासपीठ
विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी तयार केलेल्या 45 प्रकल्पांचे प्रदर्शन भरवण्यात आले. चित्रकला, हस्तकला, रांगोळी प्रदर्शनात 150 विद्यार्थी सहभागी झाले. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रवीण चाफेकर, शालेय समिती अध्यक्ष संजय मळेकर, संस्थेचे सदस्य सतीश लोखंडे यांनी प्रदर्शनासाठी भेट दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे चांगले व्यासपीठ मिळवून देणे हसत खेळत शिक्षण हेच या कार्यक्रमाच उद्दिष्ट होत. यात डोंगरी नृत्य, ग्रामीण कला, यांचा वारसा जोपासला जातो असे सुंदर नूतनीकरण विद्यार्थ्यांकडून झाले यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांना सहभाग घेऊन विविध कार्यक्रम सादर केले.