विद्यार्थ्यांच्या गुणवत्तासाठी भर द्या

0

नंदुरबार । जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केल्यास जिल्हा कॉपीमुक्त होण्यास होण्यास मदत होईल. तसेच जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन खासदार डॉ.हिना गावीत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती बैठक सोमवारी 20 मार्च रोजी घेण्यात आली. त्यावेळी खासदार डॉ. हिना गावीत बोलत होत्या. खासदार डॉ. हिना गावीत यांनी सांगितले की, की, विद्युत विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व गाव-पाड्यांवर विद्युतीकरण करुन त्याचा तपशिल तात्काळ सादर करावा, प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी एक्सप्रेस फिडर बसविण्याची कार्यवाही करावी, ज्या ठिकाणी ट्रॉन्सफार्मरची आवश्यकता आहे त्याठिकाणी त्वरीत ट्रॉन्सफार्मर बसविण्याची कार्यवाही करावी, येत्या काळात भारत संचार निगम लि. टॉवर उभारण्यात येणार असल्याने ही कामे त्वरीत करावी. असे आदेश देण्यात आले.

वितरणाच्या कामांबाबत घेतली माहिती
समिती सदस्य डॉ. कांतीलाल टाटीया यांनी यावेळी वीज कनेक्शन, विद्युत ट्रान्सफार्मर, रस्त्यांची कामे, वस्ती शाळा, शौचालये, रोहयोची कामे, शिक्षण पोषण आहार आदी विषयांवर विविध मुद्दे उपस्थित करुन त्यावर संबंधित विभागाने काय कारवाई केली याबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनीकेंद्र व राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागामार्फत राबविल्या जाणार्‍या योजना जिल्ह्यात राबवितांना येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी सर्वअधिकार्‍यांनी योजनांची अंमलबजावणी आपापसात समन्वय ठेवून योजना वेळेत पूर्ण कराव्यात, अशा सूचना दिल्यात.

ग्रामीण भागातील कामांचा घेतला आढावा
जिल्ह्यात महावितरण विभागास सर्वात जास्त निधी देण्यात आला असून या विभागाने त्यांची कामे प्राधान्याने करावीत. पुढील काळात प्रत्येक गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत कामे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ही कामे मुख्यत्वे करून स्थलांतरीत होणार्‍या गावांना लक्ष्य करून त्यामध्ये ही कामे उपलब्ध करुन दिल्यास स्थलांतर कमी होण्यास मदत होईल, असेही खासदार डॉ. गावीत यांनी यावेळी सांगितले. आमदार डॉ. विजयकुमार गावीत म्हणाले की, विविध अंमलबजावणी यंत्रणांनी दिलेले कामे वेळेत करावीत म्हणजेच आलेला निधी खर्च होईल.प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ज्या रस्त्यांची कामे ना-हरकत प्रमाणपत्रामुळे थांबली असतील त्याबाबत तात्काळ पाठपुरावा करुन कामे सुरु करावी. निधी वितरीत करुन ज्या रस्त्यांची कामे झालेली नसतील अशा ठेकेदारांची नांवे काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांनी संबंधित विभांगाना दिल्या.

सभागृहात यांची उपस्थिती
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आ. डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, सहाय्यक जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती, समिती सदस्य डॉ. कांतीलाल टाटीया, नारायण सामुद्रे, बळीराम पाडवी, सविता जयस्वाल तसेच विविध अंमलबजावणी यंत्रणाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.