जळगाव। येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात काल दि. 25 रोजी गणरायाची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढुन विधीवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवानिमीत्त वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रमांचेही आयोजन केले आहे. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर व सौ. डॉ. माया आर्विकर यांच्या हस्ते गणरायाची स्थापना करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, गोदावरी पाटील, डॉ. केतकी पाटील, प्रमोद भिरूड, आशिष भिरूड आदींसह मान्यवर उपस्थित होते.
रूग्णांना फळेवाटप
गणेशोत्सवानिमीत्त विद्यार्थ्यांनी गो ग्रीनसह, स्वच्छ भारत अभियान, वृक्ष वाचवा, मोबाईलच्या सवयींबाबत जनजागृती असे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. तसेच समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो या अनुषंगाने रूग्णालयात उपचारासाठी भरती झालेल्या गरजु रूग्णांना कपडे वाटप, फळ वाटप केले जाणार असुन रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांसाठी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आयोजन समिती नेमण्यात आली असुन विद्यार्थी परीश्रम घेत आहे. डॉ. उल्हास पाटील फिजीओथेरेपी महाविद्यालयातही गणरायाची मोठ्या जल्लोषात स्थापना करण्यात आली. गणरायाच्या स्वागताप्रसंगी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांच्या उपस्थितीत पुजा करण्यात आली.
बाप्पाच्या आगमनाची धम्माल
गोदावरी सीबीएसई स्कुलमध्ये बाप्पाच्या आगमनानिमीत्त बच्चे कंपनीनी जोरदार धम्माल केली. गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी सीबीएसई स्कुलमध्येही बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. स्कुलच्या विद्यार्थ्यांनी बाप्पासाठी आकर्षक सजावट केली होती. सकाळी गणरायाचे आगमन झाल्यानंतर वाद्यांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालात वाद्याच्या गजरात गणपती बाप्पा मोरयाचा जल्लोष केला. मिरवणूकीत विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारे फलकही लावले होते. पर्यावरणपुरक संदेशही विद्यार्थ्यांनी यावेळी दिले. स्कुलमध्ये बाप्पाची विधीवत पुजन करून स्थापना करण्यात आली. याप्रसंगी स्कुलच्या प्राचार्या निलीमा चौधरी यांच्यासह शिक्षिका व पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जल्लोषात स्थापना
गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी करण्यात आली होती. बाप्पाच्या स्वागतासाठी ढोल-ताशांचे पथक, डिजे सज्ज करण्यात आले होते. दुपारी महाविद्यालयात गणरायाची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आणि डिजेच्या तालावर विद्यार्थ्यांनी गणरायाचे जोरदार स्वागत केले. याठिकाणी विधीवत गणरायाची स्थापना करण्यात आली. यावेळी डॉ. व्ही.जी. अराजपुरे, प्रविण फालक, यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापक, आणि मान्यवर उपस्थित होते.